चालकाचा ताबा सुटल्याने कार ६० फूट खोल दरीत कोसळली; तीन भावांसह पुतण्या ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 23:01 IST2022-05-11T23:00:35+5:302022-05-11T23:01:38+5:30
नगर- बीड मार्गावरील म्हसोबा फाटा नजीक घाटात एका वळणावर झाला अपघात

चालकाचा ताबा सुटल्याने कार ६० फूट खोल दरीत कोसळली; तीन भावांसह पुतण्या ठार
कडा/आष्टी (जि.बीड) : बीड येथून नगरला कामानिमित्त निघालेल्या कुटुंबाची कार ६० फूट खोल दरीत कोसळून चौघे ठार झाले. मृतांत तीन सख्खे भाऊ व एका पुतण्याचा समावेश आहे. अन्य एक जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ११ मे रोजी रात्री नगर- बीड मार्गावरील म्हसोबा फाट्याजवळ ही भीषण दुर्घटना घडली.
सतीश पंजुमल टेकवाणी (५८), शंकर पंजुमल टेकवाणी (४६), सुनील पंजुमल टेकवाणी (४८, रा. कारंजा परिसर, बीड) व लखन महेश टेकवाणी (२०,रा. सारडा कॅपिटलजवळ, बीड) अशी मयतांची नावे आहेत. नीरज शंकर टेकवाणी (२०) हा जखमी आहे. बुक स्टॉल, हॉटेलींग व्यवसायात असलेले टेकवाणी कुटुंबातील पाच जण कारने (एमएच २३ एएस-४०२५) व्यावसायिक कामासाठी बीडहून नगरकडे जात होते.
नगर- बीड मार्गावरील म्हसोबा फाटा नजीक घाटात एका वळणावर चालक नीरज टेकवाणीचा ताबा सुटला. त्यामुळे कार ६० फूट खोल दरीत कोसळली. यात सुनील टेकवाणी, शंकर टेकवाणी, सतीश टेकवाणी व लखन टेकवाणी या चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर नीरज टेकवाणी जखमी आहे.
घटनास्थळी अंभोरा ठाण्याचे उपनिरीक्षक रवि देशमाने, पो. ना. प्रल्हाद देवडे, हवालदार लुईस पवार यांनी भेट दिली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी कडा प्राथमिक आरोग्य केंद्रांत पाठवण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.साेमेश्वर घोडके, डॉ.नितीन मोरे, डॉ.प्रसाद वाघ,डॉ. नितीन राऊत व डॉ. अनिल आरबे यांनी तपासणी करुन त्यांना मयत घोषित केले.