खळबळजनक! चार दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा घराशेजारील शेतात आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 11:59 IST2023-11-20T11:59:04+5:302023-11-20T11:59:31+5:30
घरापासून हाकेच्या अंतरावर वृध्दाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे

खळबळजनक! चार दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा घराशेजारील शेतात आढळला मृतदेह
- नितीन कांबळे
कडा (बीड) : चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ७४ वर्षीय वृध्दाचा आज सोमवारी ( दि. २० ) सकाळी घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतातील बांधाच्या खड्ड्यात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. धनाजी गंगाराम वांजरे ( रा.दादेगांव) असे मृताचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील वांजरे वस्तीवरील ७४ वर्षीय धनाजी गंगाराम वांजरे हे मागील चार दिवसांपासून बेपत्ता होते. दरम्यान, आज सकाळी ९ वाजता एक शेतकरी स्वतःच्या शेतात जनावरं बांधण्यासाठी जात असताना बांधा जवळील खड्ड्यात मृतदेह आढळून आला. त्याने ग्रामस्थांना आणि पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच अंभोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक रवि देशमाने, पोलीस उपनिरीक्षक देवीदास सातव, पोलीस अंमलदार सुदाम पोकळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
तपासानंतर मृतदेह धनाजी गंगाराम वांजरे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समजू शकले, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी दिली.