मस्साजोगमध्ये वातावरण तापलं: जलसमाधी आंदोलनावेळी महिलेला चक्कर; SP काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 14:52 IST2025-01-01T14:51:42+5:302025-01-01T14:52:20+5:30

आक्रमक झालेल्या गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत हेदेखील आंदोलनस्थळी पोहोचले होते.

The atmosphere heated up in Massajog: Woman felt dizzy during Jalsamadhi protest; What did SP say? | मस्साजोगमध्ये वातावरण तापलं: जलसमाधी आंदोलनावेळी महिलेला चक्कर; SP काय म्हणाले?

मस्साजोगमध्ये वातावरण तापलं: जलसमाधी आंदोलनावेळी महिलेला चक्कर; SP काय म्हणाले?

Beed Sarpanch Murder Case: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सातपैकी चार आरोपींना अटक करण्यात आली असली तरी अन्य तीन आरोपी अजूनही फरार आहेत. यामध्ये हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याचाही समावेश आहे. घटनेला तीन आठवडे उलटून गेल्यानंतरही आरोपींना पकडण्यात अपयश आल्याने पोलीस प्रशासनाला जागं करण्यासाठी आज मस्साजोगच्या गावकऱ्यांकडून जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. यावेळी एका महिलेला चक्कर आल्याने तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं. तर आक्रमक झालेल्या गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत हेदेखील आंदोलनस्थळी पोहोचले होते.

"वाल्या कराडला फाशी द्या, फरार आरोपींना अटक करा," अशा घोषणा आंदोलनकर्त्यांकडून देण्यात येत होत्या. तसंच दोन तासांहून अधिक काळ गावकरी तलाव्यातील पाण्यात असल्याने पोलीस प्रशासनाची भूमिका मांडण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत मस्साजोगमध्ये पोहोचले. गावकऱ्यांनी काँवत यांच्यासमोर आपल्या भावना मांडल्या. "२२ दिवस होऊनही तुम्ही अजून आरोपींना पकडलेलं नाही. आरोपींना कधी अटक करणार, हे आम्हाला सांगा. तुम्हीच तारीख द्या आणि त्या तारखेपर्यंत आरोपींना अटक झाली नाही तर आम्हाला तरी येऊन गोळ्या घाला," अशा शब्दांत गावकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला.

नवनीत काँवत काय म्हणाले?

गावकऱ्यांना कारवाईबाबत आश्वस्त करताना नवनीत काँवत म्हणाले की, "पोलीस युद्धपातळीवर आरोपींचा शोध घेत आहेत. या  प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे असला तरी गुन्ह्यातील फरार तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी आमची यंत्रणा काम करत आहे आणि लवकरच आम्ही आरोपींना अटक करू. गावकऱ्यांनी आम्हाला १० दिवसांचा वेळ दिला आहे. मात्र आम्ही त्याआधीच आरोपींना अटक करू," असा शब्द त्यांनी गावकऱ्यांना दिला आहे.

दरम्यान, खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातही सहभागी असल्याचा संशय आहे. कराड हा काल सीआयडीला शरण आल्यानंतर रात्री उशिरा झालेल्या सुनावणीनंतर कोर्टाने कराडला १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे वाल्मीक कराडच्या चौकशीत या प्रकरणाचे धागेदोरे उलडगणार का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: The atmosphere heated up in Massajog: Woman felt dizzy during Jalsamadhi protest; What did SP say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.