दहशत कायम! शेतकऱ्याचा बळी, वासरांवर हल्ला आता बिबट्याचे थेट कानिफनाथ घाटात दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 19:37 IST2025-10-15T19:37:12+5:302025-10-15T19:37:37+5:30
वनविभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा

दहशत कायम! शेतकऱ्याचा बळी, वासरांवर हल्ला आता बिबट्याचे थेट कानिफनाथ घाटात दर्शन
कडा (बीड): आष्टी तालुक्यात बिबट्याने निर्माण केलेली दहशत कमी होण्याऐवजी वाढत असून, आता बिबट्याचे थेट वर्दळीच्या रस्त्यावर दर्शन होऊ लागले आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास कानिफनाथ घाटात (पिंपरी घाटा) बिबट्या रस्त्यावर दिसल्याने वाहनचालकांमध्ये मोठी घबराट पसरली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी आष्टी तालुक्यातील बावी येथे बिबट्याने एका शेतकऱ्याला ठार मारले होते. या घटनेचा थरार शांत होत नाही तोच, मंगळवारी रात्री वेताळवाडी येथे घरासमोरील वासरांवर हल्ला केल्याची घटना ताजी आहे. माणसाला आणि पाळीव प्राण्यांना लक्ष्य करणाऱ्या या बिबट्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे.
बुधवारी सायंकाळी कानिफनाथ घाटातून प्रवास करणाऱ्या चारचाकी वाहनचालकांना अचानक बिबट्या रस्त्यावर दिसला. प्रसंगावधान राखून त्यांनी तातडीने गाडीच्या काचा बंद केल्या आणि हा थरार कॅमेऱ्यात कैद केला. सध्या हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
शेतकऱ्याला ठार मारणारा बिबट्या थेट रस्त्यावर! बीड जिल्ह्यातील कानिफनाथ घाटातील थरार पाहा. #beed#leopard#marathwadapic.twitter.com/Qrkz1MIsiA
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) October 15, 2025
घाटातून प्रवास करणे धोकादायक
कानिफनाथ घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीविताला आता धोका निर्माण झाला आहे. शेतात काम करणारे शेतकरी आणि घाटमाथ्यावरून प्रवास करणारे प्रवासी, या दोघांनाही बिबट्याच्या भीतीने ग्रासले आहे.
बिबट्याच्या या वाढत्या वावरामुळे वनविभागाकडून नागरिकांना वारंवार खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, केवळ आवाहन न करता, वनविभागाने या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकरी करत आहेत. जीवाच्या भीतीने ग्रासलेल्या नागरिकांना या दहशतीतून लवकर मुक्तता मिळेल का, हाच मुख्य प्रश्न आहे.