टेम्पो-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एकाचा मृत्यू, एकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 18:21 IST2024-09-04T18:21:18+5:302024-09-04T18:21:31+5:30
अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचे दोन तुकडे होऊन रस्त्यावर विखुरले.

टेम्पो-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एकाचा मृत्यू, एकजण जखमी
दिंद्रुड ( बीड) : बीड -परळी महामार्गावरील धारूर तालुक्यातील तेलगावजवळ दुचाकी आणि टेम्पोच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज, बुधवारी दुपारी एक वाजेदरम्यान घडली. अपघातानंतर टेम्पो चालक पसार झाला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
सुरेश अश्रुबा वारकड (४५ ) व शंकर भास्कर वारकड ( रा. अम्ला ता. धारूर ) हे दोघे दुचाकीवर माजलगाव येथील लग्नास निघाले होते. दरम्यान बीडकडून परळीकडे जाणारा टेम्पो (एम एच १२ एस एफ ६०६८) आणि वारकड यांच्या दुचाकीची (एम एच १२ सि क्यू १८१०) निर्मळ पेट्रोल पंपासमोर समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचे दोन तुकडे होऊन रस्त्यावर विखुरले.
माहिती मिळताच दिंद्रुड पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारार्थ रवाना केले. येथे डॉक्टरांनी तपासून सुरेश आश्रुबा वारकड यांना मृत घोषित केले. तर गंभीर जखमी शंकर वारकड यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर चालक टेम्पोला चावी तशीच ठेवून अपघातस्थळावरून पसार झाला. पोलिसांनी टेम्पो व दुचाकी दिंद्रुड पोलीस स्टेशनमध्ये जमा केले. ही कारवाई सपोनी अण्णाराव खोडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बालाजी सूरेवाड व जमादार अफसर सय्यद यांनी केली.