सेल्सटॅक्स विभागात खळबळ; कारमध्ये अधिकाऱ्याचा मृतदेह, सुसाइड नोटमध्ये वरिष्ठांचा उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 14:39 IST2026-01-19T14:37:59+5:302026-01-19T14:39:07+5:30
या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सेल्सटॅक्स विभागात खळबळ; कारमध्ये अधिकाऱ्याचा मृतदेह, सुसाइड नोटमध्ये वरिष्ठांचा उल्लेख
बीड : येथील जीएसटी कार्यालयातील कर अधिकाऱ्याचा मृतदेह बीड तालुक्यातील कपिलधार रोडवरील कमानीजवळ शनिवारी सकाळी कारमध्ये संशयास्पदरित्या आढळून आला होता. मयत सेल्सटॅक्स ऑफिसर सचिन जाधवर यांच्याजवळ एक सुसाइड नोट सापडली आहे. त्या सुसाइड नोटमध्ये वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून सचिन यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयताजवळ सुसाइड नोट सापडली आहे, त्या सुसाइड नोटचा जप्ती पंचनामा करणे बाकी आहे. त्या सुसाइड नोटमध्ये ज्या अधिकाऱ्याचे नाव होते, तो अधिकारी सचिन जाधवर यांच्या मृत्यूची माहिती कळल्यानंतर जिल्हा रुग्णालयात आला होता. मात्र, त्या अधिकाऱ्याला याची माहिती नव्हती. नातेवाइकांचा रोष त्या अधिकाऱ्यावर ओढवला जाऊ शकतो, म्हणून त्या अधिकाऱ्यास संरक्षणार्थ पोलिस ठाण्यात आणून बसविण्यात आले होते. त्यानंतर त्यांना जाऊ दिले.
मात्र, अद्याप त्यांच्या कुटुंबीयांनी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली नाही. तक्रार दाखल करताच पुढील कारवाई केली जाईल. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ज्या कारमध्ये सचिन जाधवर यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यामध्ये मडके आढळून आल्याचेही प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील चुंब या मूळ गावी शनिवारी रात्री ११:०० वाजण्याच्या सुमारास सचिन जाधवर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ - भावजयी असा परिवार आहे.
तपास सुरू आहे
प्रशासकीय कारणावरून आत्महत्या केल्याचे सुसाइड नोटमध्ये नमूद आहे. सदरील प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. याप्रकरणी अद्याप कोणलाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.
-नवनीत काँवत, जिल्हा पोलिस अधीक्षक, बीड