‘त्या' कैद्याचा रुग्णालयातही आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 14:36 IST2018-03-25T14:36:32+5:302018-03-25T14:36:32+5:30
जिल्हा कारागृहातून ज्ञानेश्वर बालाजी जाधव या कैद्याने दहा दिवसांपूर्वी भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नात तो गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.

‘त्या' कैद्याचा रुग्णालयातही आत्महत्येचा प्रयत्न
बीड - येथील जिल्हा कारागृहातून ज्ञानेश्वर बालाजी जाधव या कैद्याने दहा दिवसांपूर्वी भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नात तो गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, शनिवारी सकाळच्या सुमारास त्याने रुग्णालयाच्या शौचालयात जाऊन गळा कापून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. या ठिकाणी बंदोबस्तास असलेल्या दोन होमगार्डच्या सतर्कतेमुळे ज्ञानेश्वर जाधवचा आत्महत्येचा प्रयत्न फसला आणि मोठा अनर्थ टळला. जाधववर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अंबाजोगाई येथील एका चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी ज्ञानेश्वर बालाजी जाधव (वय ३०, रा. रुपचंद नगर तांडा, ता. रेणापूर, जि. लातूर) हा जिल्हा कारागृहात कैदेत आहे. १५ मार्च रोजी ज्ञानेश्वरने कारागृहाच्या भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात उंचावरून पडल्याने त्याचे हात-पाय मोडले होते. त्यामुळे त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात ५ क्रमांकच्या वार्डात उपचार सुरु होते. २४ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ज्ञानेश्वरला शौचास जायचे असल्याने राखावालीवर असलेले अनंता शिंदे आणि तुकाराम नागरगोजे हे दोन होमगार्ड त्याला शौचालायाकडे घेऊन गेले आणि दरवाजावर थांबले. यावेळी ज्ञानेश्वरने शौचालयात जाऊन खिडकीचा काच फोडला आणि गळ्यावर मारून घेतला. काच फुटल्याचा आवाज आल्याने होमगार्डने तातडीने दरवाजा उघडून ज्ञानेश्वरचे हात पकडले. तरीदेखील ज्ञानेश्वर ‘तुम्ही येथुन निघुन जा, मला मरायचे आहे’ असे म्हणत पुन्हा काच मारून घेण्याचा प्रयत्न करीत होता. त्यानंतर होमगार्डनी त्याच्या हातातील काच फेकून दिली. या घटनेत ज्ञानेश्वर किरकोळ जखमी झाला आहे.
याप्रकरणी होमगार्ड अनंता शिंदे यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर जाधव याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहा. फौजदार गांधले हे करत आहेत.