ऊसतोड मुकादमाची २२ लाखांची फसवणूक; माजलगावच्या पोट-मुकादमावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 16:40 IST2026-03-14T16:38:36+5:302026-03-14T16:40:02+5:30
३२ मजूर आणि वाहनांच्या नावाखाली २२ लाखांची फसवणूक, बीडमधील खळबळजनक प्रकार

ऊसतोड मुकादमाची २२ लाखांची फसवणूक; माजलगावच्या पोट-मुकादमावर गुन्हा दाखल
वडवणी (जि. बीड) : मजूर आणि ऊसतोडणीची वाहने पुरविण्याचे आमिष दाखवून एका ऊसतोड मुकादमाची तब्बल २२ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी माजलगाव येथील एका पोट-मुकादमाविरुद्ध वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडकी (ता. वडवणी) येथील रहिवासी असलेले रामकिसन शंकर चोले हे ऊसतोड मुकादमाचा व्यवसाय करतात. २०२१-२२ च्या गळीत हंगामासाठी त्यांनी कर्नाटक राज्यातील 'श्री बसवेश्वर शुगर्स' या कारखान्याशी मजूर व वाहने पुरविण्याचा करार केला होता. कारखान्याने कामाच्या मोबदल्यात चोले यांच्या बँक खात्यावर २२ लाख ८० हजार रुपये जमा केले होते. याचदरम्यान, माजलगाव येथील सुधाकर भानुदास राठोड याने चोले यांची भेट घेऊन स्वतःकडे दोन टोळ्या, ३२ मजूर आणि दोन वाहने असल्याचे सांगत ती पुरविण्याचे आश्वासन दिले. यावर विश्वास ठेवून चोले यांनी राठोड याच्यासोबत नोटरी केली आणि कारखान्याकडून मिळालेली संपूर्ण रक्कम आरटीजीएस व चेकद्वारे त्याच्या खात्यावर वर्ग केली. रामकिसन चोले यांच्या तक्रारीवरून वडवणी पोलिसांनी सुधाकर भानुदास राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार अशोक केदार हे करत आहेत.
पैसे घेऊनही काम नाही, उलट दमदाटी
पैसे स्वीकारल्यानंतर सुधाकर राठोड याने ठरल्याप्रमाणे मजूर किंवा वाहने कारखान्याला पुरवली नाहीत. चोले यांनी वारंवार विचारणा करूनही राठोडने पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. एवढेच नव्हे तर, पैसे मागणाऱ्या चोले यांना त्याने दमदाटी करण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चोले यांनी वडवणी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.