विद्यार्थिनीला जातिवाचक शिवीगाळ करत हॉल तिकीट नाकारले; संस्थाचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 16:55 IST2025-10-08T16:50:27+5:302025-10-08T16:55:02+5:30
बीड : मागील वर्षाच्या प्रवेशाचे पैसे भर, अन्यथा तुला हॉल तिकीट मिळणार नाही, असे म्हणत विद्यार्थिनीला जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ...

विद्यार्थिनीला जातिवाचक शिवीगाळ करत हॉल तिकीट नाकारले; संस्थाचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद
बीड : मागील वर्षाच्या प्रवेशाचे पैसे भर, अन्यथा तुला हॉल तिकीट मिळणार नाही, असे म्हणत विद्यार्थिनीला जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यात संस्था चालक दिलीप रघुनाथ मुंडे यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वडवणी येथील रहिवासी विद्यार्थिनीने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात वडवणी येथील समर्थ नर्सिंग कॉलेज येथे एएनएम या कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. प्रवेशावेळी संस्था चालकांकडून प्रवेश शुल्क आणि परीक्षा फीस कुठलीच लागणार नाही, असे विद्यार्थिनीला सांगण्यात आले होते. तसेच मोफत शिक्षण दिले जाईल, असे सांगितले होते. फक्त समाज कल्याणकडून येणारी स्कॉलरशिप कॉलेजला द्यावी लागेल, असे सांगितले होते. त्यानुसार विद्यार्थिनीने समर्थ नर्सिंग कॉलेजला आपला प्रवेश घेतला होता.
दरम्यान, गतवर्षी विद्यार्थिनी एका विषयात नापास झाल्याने या विषयाच्या परीक्षेचे हॉल तिकीट आणण्यासाठी ती ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कॉलेजला गेली. हॉल तिकीट देण्याची मागणी करताच संस्था चालक मुंडे यांनी तुला मागील फीस भरावी लागेल, असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ केली व विद्यार्थिनीला हॉल तिकीट दिले नाही. त्यामुळे विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसानही झाले आहे. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून वडवणी पोलिस ठाण्यात समर्थ नर्सिंग कॉलेजचे संस्था चालक दिलीप रघुनाथ मुंडे यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास माजलगाव उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश गायकवाड करीत आहेत.