नांदूरघाट शिवारात भरधाव कारने दुचाकीस उडवले; एकजण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 18:45 IST2020-02-26T18:44:52+5:302020-02-26T18:45:36+5:30
कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक

नांदूरघाट शिवारात भरधाव कारने दुचाकीस उडवले; एकजण जागीच ठार
केज : तालुक्यातील नांदूरघाट येथे भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ( दि. २५ ) सायं ७:४५ च्या दरम्यान घडली. सतीश छंदर घोडके ( ४५, रा. शिरूर घाट ता. केज ) असे मृताचे नाव असून दुचाकीवर मागे बसलेले केशव विश्वनाथ कुरुंद ( ६५, रा. डोंगरेवाडी ता. वाशी जि. उस्मानाबाद) हे गंभीर जखमी आहेत.
या बाबतची माहिती अशी की, मंगळवारी सतीश छंदर घोडके व त्यांचे व्याही केशव विश्वनाथ कुरुंद हे दुचाकीवरून (एमएच-१२/सीएस-९६५४) नांदूरघाट-केज या रस्त्याने प्रवास करीत होते. दरम्यान, नांदूरघाट शिवारात समोरून येणाऱ्या भरधाव कारने (एमएच-२३/ई-९४५०) त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. यात सतीश घोडके यांचा जागीच मृत्यू झाला. तर कुरुंद हे गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी चालकाने कार न थांबवता तेथून पलायन केले.
या प्रकरणी मयताचे नातेवाईक अशोक उत्तम गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार मुकुंद ढाकणे हे करत आहेत.