कधी सुंदर डीपीच्या प्रेमात, कधी बक्षिसाचा मोह नडला; मिनिटांतच बँक खाते झाले साफ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 03:22 PM2022-03-21T15:22:44+5:302022-03-21T15:24:48+5:30

वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून सायबर भामटे लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात व त्यानंतर मोठ्या हुशारीने गंडा घालतात.

Sometimes I fell in love with a beautiful DP, sometimes I was tempted by a reward, the bank account was cleared | कधी सुंदर डीपीच्या प्रेमात, कधी बक्षिसाचा मोह नडला; मिनिटांतच बँक खाते झाले साफ

कधी सुंदर डीपीच्या प्रेमात, कधी बक्षिसाचा मोह नडला; मिनिटांतच बँक खाते झाले साफ

Next

बीड : कधी सुंदर डीपी, कधी मधुर आवाज, तर कधी लॉटरी, बक्षिसाचे आमिष दाखवून तुमचे बँक खाते काही मिनिटांत साफ केले जाऊ शकते. अशा प्रकारच्या मोहाला बळी पडून जिल्ह्यात चालू वर्षी अडीच महिन्यात सायबर भामट्यांनी सुमारे ४७ लाख रुपयांना चुना लावल्याची माहिती समोर आली आहे.

वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून सायबर भामटे लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात व त्यानंतर मोठ्या हुशारीने गंडा घालतात. सोशल मीडियावर सुंदर डीपी ठेवून आकर्षित केले जाते, कधी कॉल करून गोड बोलून जाळ्यात अडकविले जाते, तर काही वेळा बनावट लिंक पाठवून त्याआधारे गोपनीय तपशील जाणून घेत फसवणूक केली जाते. मोबाइल हाताळताना व सोशल मीडियावर वावरताना काळजी घेणे गरजेचे बनले आहे.

ऑनलाइन फ्रॉडचा वेग अधिक

२०२१ मध्ये ऑनलाइन फ्रॉडचे १२० गुन्हे नोंद झाले होते. यात ९२ लाख १९ हजार ८०४ रुपयांची फसवणूक केली होती. यंदा अडीच महिन्यांतच गुन्ह्यांचा आकडा ५२ झाला असून, फसवणुकीची रक्कम तब्बल ४७ लाख २६ हजार रुपये इतकी आहे.

....

आमिष अन् भीती...

सायबर भामटे आमिष व भीती या दोनच क्लृप्त्या वापरतात. कधी पैसा, लॉटरी व बक्षिसांचे आमिष दाखवतात, तर कधी कधी भीती दाखवतात. तुमचे क्रेडिट कार्ड बंद होईल, केवायसी करावे लागेल, असे सांगून, तर कधी कधी सेक्स्टॉर्शनमध्ये बदनामीची भीती दाखवून राजरोस गंडविले जाते.

.....

...असा वाढला ऑनलाइन फ्रॉड

वर्ष ऑनलाइन फ्रॉडचे गुन्हे

२०२० ३९

२०२१ १२०

२०२२ ५२

.....

...अशी घ्या खबरदारी

सोशल मीडियावर वेगवेगळी शक्कल लढवून सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करतात. अनेकदा बनावट अकाउंटचा वापर केला जातो. त्यामुळे अनोळखी व्यक्तींशी मैत्री टाळणे, त्यांना कुठल्याही प्रकारची गोपनीय माहिती न देणे, स्वत:च्या अकाउंटचे पक्के व सुरक्षित पासवर्ड ठेवणे हाच यावरील प्रभावी उपाय आहे, असे सायबर सेलचे पो.नि. रवींद्र गायकवाड यांनी सांगितले.

....

कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या आमिषांना बळी पडू नये. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे. तपासाच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत. ऑनलाइन फसवणूक झाल्यावर एका तासाच्या आत सायबर सेल किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी तक्रार केल्यास नक्कीच काही प्रमाणात रक्कम परत मिळवता येते.

-सुनील लांजेवार, प्रभारी पोलीस अधीक्षक, बीड

.....

Web Title: Sometimes I fell in love with a beautiful DP, sometimes I was tempted by a reward, the bank account was cleared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.