धक्कादायक ! बीडमध्ये एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर तलवारीने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 19:57 IST2021-01-01T19:54:07+5:302021-01-01T19:57:15+5:30
Sword attack on a minor girl out of one-sided love in Beed वर्षभरापूर्वी पीडित १७ वर्षीय मुलीची ओळख पोपटसोबत झाली होती.

धक्कादायक ! बीडमध्ये एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर तलवारीने वार
बीड : एकतर्फी प्रेमातून माझ्याशी का बोलत नाहीस, असे कारण काढून एका अल्पवयीन मुलीवर तलवारीने सपासप वार केल्याची घटना बीड तालुक्यातील रामनगर येथे सोमवारी घडली. यामध्ये पीडिता गंभीर जखमी झाली असून, बीडमधीलच एका खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, आरोपी फरार आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पोपट बोबडे (२७, रा. महालक्ष्मी चौक, रामनगर, ता. बीड), असे आरोपीचे नाव आहे. वर्षभरापूर्वी पीडित १७ वर्षीय मुलीची ओळख पोपटसोबत झाली होती. पोपट बोबडे हा तिच्याशी मोबाइलवर बोलत असे. दरम्यान, एप्रिल २०२० मध्ये पोपट बोबडे अचानक तिच्या घरी गेला. यामुळे कुटुंबियांनी मुलीला जाब विचारला. तो अचानक घरी आल्यामुळे तिने ‘तू येथे का आलास’ अशी विचारणा करीत त्याच्याशी बोलणे बंद केले. यानंतर तिला कुटुंबियांनी बीडमधील घरी ठेवले. आठ दिवसांपूर्वी आई आजारी असल्याने पीडित मुलगी गावी आली होती.
३० डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता तिचे आई-वडील किराणा आणण्यासाठी गेले होते. घरी वृद्ध आजोबा होते. पीडित मुलगी तोंड धुण्यासाठी घराबाहेर आल्यानंतर पोपट बोबडे याने पाठीमागून येऊन अचानक तिच्यावर तलवारीने हल्ला केला; परंतु हा वार तिने हातावर झेलला. त्यानंतर ती खाली कोसळली. ‘माझ्याशी का बोलत नाहीस’ असे म्हणत पोपटने पुन्हा तिच्यावर दोन वार केले. यानंतर तो तेथून पसार झाला. पीडितेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, तिच्या पायाला दोन फ्रॅक्चर झाले आहेत. आरोपीविरोधात ग्रामीण ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे तपास करीत आहेत.