ट्यूशनमध्ये विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; मुंडे बहीण-भाऊ आक्रमक, एसआयटी नेमण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:30 IST2025-07-01T13:21:15+5:302025-07-01T13:30:02+5:30
महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ट्यूशनमध्ये विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; मुंडे बहीण-भाऊ आक्रमक, एसआयटी नेमण्याची मागणी
बीड : शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलातील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विजय पवार व प्रशांत खाटोकर या दोन शिक्षकांनी लैंगिक छळ केला. या प्रकरणात भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आ. धनंजय मुंडे आक्रमक झाले आहेत. पंकजा यांनी पोलिस अधीक्षकांना कठोर आणि कडक कार्यवाही करा, अशा सूचना दिल्या आहेत. तर, धनंजय यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन महिला आयपीएस अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे.
धनंजय मुंडे यांनी रविवारी रात्री विजय पवार याला बीडचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ. संदीप क्षीरसागर यांचा आश्रय असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत लैंगिक छळाचे प्रकरण सांगितले. दोन्ही आरोपींना पोलिसांनी वैद्यकीय रजेवर व अन्य तालुक्यात नियुक्त असलेल्या अधिकाऱ्यांमार्फत नाट्यमयरीत्या अटक केली असून, या प्रकरणात सुरू असलेला तपास समाधानकारक नसल्याचे सांगितले. याप्रकरणी तपासात डिजिटल पुरावे गोळा करणे, ही प्राथमिकता होती. मात्र, आरोपी, त्यांचे नातेवाईक, मदत करणारे यांचे सीडीआर, आयपीडीआर, व्हॉट्सॲप चॅट, इन्स्टा, चॅट, प्रायव्हेट कॉलिंग, मोबाइल डेटामधील व्हिडीओ, फोटो, व्हॉट्सॲप कॉल, फेस टाईम कॉल यांपैकी पोलिसांनी अद्याप काहीही ताब्यात घेतले नसल्याची माहिती आहे. तसेच संकुलात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये १३ जून पूर्वीचे फुटेज उपलब्ध नाही, अशा अनेक त्रुटी पोलिस तपासात दिसून येत असल्याचा उल्लेखही धनंजय मुंडे यांनी केला आहे.
आरोपींवर कडक कार्यवाही करा - पंकजा मुंडे
विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोर आणि कडक कार्यवाही करा, अशा सूचना मंत्री पंकजा मुंडे यांनी पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत. शिक्षकांचे हे कृत्य गंभीर स्वरूपाचे आहे, त्यांना ताब्यात घेतले असले तरी ते सुटले जाऊ नयेत, यासाठी त्यांच्यावर तात्काळ कडक कार्यवाही करा. यासंदर्भात आणखी पालकांच्या तक्रारी असल्यास त्यांना शासनाची संपूर्ण सुरक्षा दिली जाईल, त्यांनी यासाठी पुढे यावे, असे आवाहनही मंत्री पंकजा यांनी केले.