शाळकरी मुलाच्या दप्तरात ‘एअरगन’?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:46 IST2018-10-11T23:45:06+5:302018-10-11T23:46:36+5:30
शहरातील जुन्या भागातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेत आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याजवळ एअरगन आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. बाहेर गावठी कट्टयाची अफवा पसरल्याने पोलिसांनी तातडीने दखल घेत या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीअंती ती एअरगन असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेमुळे दैनंदिन व्यापात पालकांचे आपल्या पाल्यांकडे दुर्लक्ष होत आहे का? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शाळकरी मुलाच्या दप्तरात ‘एअरगन’?
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : शहरातील जुन्या भागातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेत आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याजवळ एअरगन आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. बाहेर गावठी कट्टयाची अफवा पसरल्याने पोलिसांनी तातडीने दखल घेत या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीअंती ती एअरगन असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेमुळे दैनंदिन व्यापात पालकांचे आपल्या पाल्यांकडे दुर्लक्ष होत आहे का? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सदरील विद्यार्थी दोन दिवसांपासून शाळेत येताना एअरगन सोबत घेऊ येत होता. परंतु, ही एअरगन नसून गावठी कट्टा असल्याची अफवा अन्य विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये पसरली. ही बाब शिक्षकांच्या कानावर गेल्यानंतर हादरलेल्या शिक्षकांनी मंगळवारी त्वरित सदरील विद्यार्थ्याच्या पालकांना बोलावून घेतले आणि पाल्याकडे लक्ष देण्याची समज दिली. पालकानेही शिक्षकांची माफी मागत प्रकरण मिटविले. मात्र, या घटनेबाबत अंबाजोगाई शहर पोलिसांना माहिती मिळाल्याने त्यांनी तातडीने शाळेत जाऊन शिक्षक आणि पालकांना बोलावून घेऊन या प्रकारणाची सखोल चौकशी केली.
प्रकरण वाढल्याचे लक्षात आल्याने या विद्यार्थ्याच्या भेदरलेल्या पालकाने ही एअरगन असून आपण ती एका कृषीप्रदर्शनातून खरेदी केली असल्याचे सांगितले. तसेच, सध्या दसºयानिमित्त घरातील सर्व सामान बाहेर काढले असता ही बंदूक मुलाच्या हाती लागली आणि त्याने ती शाळेत केवळ करमणुकीच्या उद्देशाने आणली असा खुलासा करत धाय मोकलून रडत पोलिसांचे पाय धरले. पालकाची केविलवाणी अवस्था पाहून पोलिसांनी त्यांना पाल्याकडे बारकाईने लक्ष देण्याची सक्त ताकीद आणि समज दिली.
या घटनेमुळे दोन दिवसांपासून अन्य पालकात मात्र दहशतीचे वातावरण पसरले होते.
शिक्षक, पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष
आपला पाल्य शाळेत काय घेऊन जात आहे आणि काय करत आहेत याकडे पालकांचे दुर्लक्ष होत असल्याचे अनेक घटनांतून निदर्शनास येत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शाळेतील वागणुकीकडे शिक्षक गांभीर्याने लक्ष देत नाहीत असे नेहमीच आढळून येते. अनेक शिक्षक बहुतांशी वेळ मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसत असल्याचेही अनेक पालकांनी सांगितले. दोन्ही गोष्टींचा परिणाम विद्यार्थ्यांची मानसिकता आणि अभ्यासावर होत असल्याने ते चुकीच्या मार्गाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या घटनेपासून पालक आणि शिक्षकांनीही बोध घेण्याची आवश्यकता आहे.