'भावाचा जीव वाचवला, पण विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका स्वतः मृत्यूशी झुंज देतेय!' जळीत प्रकरणाचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 16:22 IST2026-01-08T16:19:58+5:302026-01-08T16:22:19+5:30
डॉ. ममता राठी यांच्या जळीत प्रकरणाचा धक्कादायक खुलासा

'भावाचा जीव वाचवला, पण विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका स्वतः मृत्यूशी झुंज देतेय!' जळीत प्रकरणाचा खुलासा
अंबाजोगाई : येथील एका महाविद्यालयातील प्रा. डॉ. ममता श्यामसुंदर जखोटिया (राठी) यांच्या जळीत प्रकारचे सत्य त्यांच्याच जबाबानंतर समोर आले आहे. त्यांचा मानलेला भाऊ धनाजी आर्य यांना आत्महत्येपासून रोखताना अपघाताने मी भाजले असल्याचे ममता राठी यांनी जबाबातून स्पष्ट केल्याने दुर्घटनेबाबतीत सुरू असलेल्या घातपाताच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. ममता राठी यांच्यावर लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती अतिचिंताजनक आहे.
डॉ. ममता राठी (रा. पिताजी माउली नगरी, अंबाजोगाई) या शहरातील एका महाविद्यालयात वाणिज्य विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. ४ जानेवारी रोजी त्यांचे मानलेले भाऊ धनाजी आर्य यांनी त्यांना फोन करून कॉलेजमधील राजकारणामुळे मोठा त्रास होत असून, आता जगण्याची इच्छा उरली नसल्याचे सांगितले. ममता यांनी तत्काळ जवळगाव फाटा येथे धाव घेतली त्या ठिकाणी धनाजी आर्य हे हातात डिझेलची बाटली घेऊन स्वतःला संपवण्याच्या तयारीत होते.
धनाजी आर्य स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत असताना ममता यांनी धाडसाने त्यांच्या हातातील बाटली हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत बाटलीतील डिझेल ममता यांच्या अंगावर सांडले. ममता यांनी धनाजीच्या हातातील काडीपेटी फेकून दिली. याच वेळी त्यांच्या कोटास अचानक आग लागली. आगीत अंगालाही जाळ लागल्याने ममता गंभीररीत्या भाजल्या गेल्या. त्यांना तातडीने लातूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले त्यांनी बर्दापूर पोलिसांना दिलेल्या जबाबात हे सांगितले आहे.
प्राध्यापिकेच्या जीवावर बेतणारा प्रसंग
प्रा. ममता राठी या उच्च विद्याविभूषित असून, त्यांनी वाणिज्य विषयात पीएच.डी. आहे. सहजसोप्या भाषेत विषय समजाविण्यात त्यांचा हातखंडा आहे. प्रा. राठी या विद्यार्थ्यांसाठी नियमित शैक्षणिक मार्गदर्शनपर व्हिडिओ पोस्ट करतात. महाविद्यालयातील इतरही अनेक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो. मानलेल्या भावाचा बचाव करताना विद्यार्थीप्रिय प्राध्यापिकेच्या जीवावर बेतणारा, असा प्रसंग अपघाताने ओढवल्याने शहरातील शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.