सतीश भोसले भाजपाचा कार्यकर्ता नाही, २०२१ मध्येच हकालपट्टी केली; समोर आलं पक्षाच स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 16:16 IST2025-03-09T16:08:47+5:302025-03-09T16:16:48+5:30

बीड जिल्ह्यातील सतीश भोसले याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Satish Bhosale is not a BJP worker was expelled in 2021 Party's explanation revealed | सतीश भोसले भाजपाचा कार्यकर्ता नाही, २०२१ मध्येच हकालपट्टी केली; समोर आलं पक्षाच स्पष्टीकरण

सतीश भोसले भाजपाचा कार्यकर्ता नाही, २०२१ मध्येच हकालपट्टी केली; समोर आलं पक्षाच स्पष्टीकरण

बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी आरोप पत्र दाखल केले आहे. यामध्ये वाल्मीक कराड याचे नावही मुख्य आरोपींमध्ये आहे. आता सतीश भोसले नावाच्या एका आरोपीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.या व्हिडीओमध्ये भोसले एका व्यक्तीला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. हा आरोपी भोसले भाजपाचा कार्यकर्ता असल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान, आता सतीश भोसले याला पक्षातून २०२१ मध्ये काढून टाकण्यात आल्याचे स्पष्टीकरण पक्षाकडून देण्यात आले आहे. 

आरोपीसाठी पोलिस ठाण्यात बर्गर, कोल्ड कॉफीचे पार्सल आले ? पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी स्पष्टच सांगितलं

भाजपा भटके विमुक्त आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मण जाधव यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. दोन-तीन दिवसापासून सतीश भोसले उर्फ खोक्या याच्याबाबत माध्यमांमध्ये बातम्या सुरू आहेत. सतीश भोसलेने भटके विमुक्त आघाडीचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांना जातीची खोटी माहिती सांगून भटक्या विमुक्त युवा आघाडी राज्य उपाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र घेतले होते. भोसले हा आदिवासी समाजाचा कार्यकर्ता आहे. त्याने चुकीची माहिती सांगून पद मिळवले होते. आम्हाला हे कळल्यानंतर २०२१ मध्ये आम्ही त्याची पदावरुन हकालपट्टी केली होती. त्यानंतर त्याचे गुन्हे पाहून त्याचा पक्षाचा राजीनामा घेतला होता, असंही डॉ. लक्ष्मण जाधव म्हणाले. 

खोक्याच्या घरावर पोलिसांचा छापा

 गुन्हेगारी घटनांमुळे मागील काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात आणखी एका गुन्हेगाराचे धक्कादायक कृत्य समोर आले आहे. जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सतीश भोसले उर्फ खोक्या याचे नवनवे प्रताप समोर येत आहेत. खोक्याकडून एका व्यक्तीला अर्धनग्न करून मारहाण केली जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो वन्यप्राण्यांची शिकार करत असल्याचीही माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर आज वनविभागाने पोलिसांसह खोक्याच्या घरावर धाड टाकली. या धाडीत शिकारीच्या साहित्यासह धारदार शस्त्रेही आढळून आल्याचे समजते.

पोलिसांनी आज सतीश भोसले याच्या घरी टाकलेल्या धाडीत मोर आणि हरीण पकडण्यासाठी लागणारी जाळी, वाघोर, धारदार शस्त्र आणि वन्य प्राण्यांचे मांसही जप्त केल्याची माहिती आहे. सतीश भोसले याने यापूर्वी अनेकदा प्राण्यांची शिकार केल्याचं बोललं जात आहे. परंतु त्याचे आता विविध व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागालाही जाग आली असून त्याच्याभोवती कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात झाली आहे.

Web Title: Satish Bhosale is not a BJP worker was expelled in 2021 Party's explanation revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.