"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:45 IST2025-07-02T17:39:15+5:302025-07-02T17:45:01+5:30
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत जुन्या सहकाऱ्याने धक्कादाय खुलासे केले आहेत.

"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
Walmik Karad:बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सूत्रधार म्हणून अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आका म्हणून समोर आलेल्या वाल्मिक कराडवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. अशातच कराडचा जुना सहकारी असल्याचा दावा करणाऱ्या विजयकुमार बांगर यांनी महत्त्वाचे खुलासे केले आहेत.वाल्मिक कराडच्या मागे एक अदृश्य शक्ती होती असा दावा विजयकुमार बांगर यांनी केला आहे. वाल्मिक कराडने तीन लोकांना माझ्यासमोर मारलं असल्याचा दावाही विजयकुमार बांगर यांनी केला.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाव आल्यानंतर वाल्मिक कराड गायब झाला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दोन दिवसांनी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्याविरुद्ध दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला होता. विविध राजकीय पक्षांकडून कराडच्या अटकेची मागणी केली जात होती. त्यानंतर कराडने पुण्यात आत्मसमर्पण केले. आता विजयकुमार बांगल यांनी कराडबाबत धक्कादायक दावा केला. महादेव मुंडेंची हत्या वाल्मिक कराडनेचे केल्याचे विजयकुमार बांगर यांनी म्हटलं आहे.
"माझ्याप्रमाणे वाल्मिक कराडच्याही मागेही एक अदृश्य शक्ती होती. त्याच्यामागे शासकीय आणि पोलीस यंत्रणा होती. तर माझ्या मागे नितीमत्ता होती. वाल्मिक कराड समाजकार्य करायचा तर खंडण्या का गोळा करायचा. त्याने एवढ्या लोकांना त्रास का दिला. त्याला सत्ता, पैशाचा मोह होता. त्याला जिल्ह्याचा बाप व्हायतं होतं. त्याला बीड जिल्हा ताब्यात घेऊन पूर्ण मराठवाडा ताब्यात घ्यायचा होता. वाल्मिक कराडने माझ्यासमोर तीन लोकांना मारलं. महादेव मुंडे प्रकरणाची मला सर्व माहिती आहे. मी त्यावेळच्या एका उच्च अधिकाऱ्याला भेटून सांगितले होते," असं विजयकुमार बांगर यांनी म्हटलं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराडचा आणखी एक गुन्हा समोर आला होता. वाल्मिक कराडवर राज्यातील १४० शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. कृषीमंत्री माझ्या जवळचे आहेत आणि ते तुम्हाला अनुदान मिळवून देतील असे सांगून वाल्मिक कराड यांनी १४० शेतकऱ्यांकडून पैसे घेतले. वाल्मिक कराडने ११ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. पैसे परत मागितले तेव्हा त्यांना मारहाण करून हाकलून लावण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. वाल्मिक कराड यांना अटक केल्यानंतर त्यांनी याबाब माहिती दिली.