संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे कारागृहाबाहेर; 'या' कारणासाठी न्यायालयाने दिली सवलत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 13:35 IST2026-03-13T13:17:41+5:302026-03-13T13:35:33+5:30
न्यायालयाच्या आदेशानुसार १३ मार्च रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार या मर्यादित वेळेत कडक पोलीस बंदोबस्तात जयराम चाटे तांबवा येथील आपल्या मूळ गावी दाखल झाला.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे कारागृहाबाहेर; 'या' कारणासाठी न्यायालयाने दिली सवलत
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोप असलेला जयराम चाटे तब्बल १४ महिन्यांनंतर तुरुंगाच्या बाहेर आला आहे. आज पोलीस बंदोबस्तात त्याला त्याच्या मूळ गावी सोडले आहे. जयरामचा धाकटा भाऊ श्रीराम चाटे यांचे २ मार्च रोजी निधन झाले असून, त्यांच्या बाराव्याच्या विधीसाठी न्यायालयाने जयरामला ही परवानगी दिली आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार १३ मार्च रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार या मर्यादित वेळेत कडक पोलीस बंदोबस्तात जयराम चाटे तांबवा येथील आपल्या मूळ गावी दाखल झाला. या प्रवासाचा आणि पोलीस बंदोबस्ताचा सर्व खर्च आरोपी जयराम चाटे याला स्वतः करावा लागणार आहे.
सरकारी वकिलांनी सुरक्षेच्या कारणास्तव या परवानगीला विरोध केला होता. मात्र न्यायालयाने मानवीय दृष्टिकोन आणि धार्मिक विधीचे महत्त्व लक्षात घेऊन कडक अटींसह ही परवानगी दिली. विधी आटोपल्यानंतर त्याला पुन्हा बीड जिल्हा कारागृहात हलवण्यात येणार आहे.
न्यायालयाने घातल्या अटी
न्यायालयाने १३ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या मर्यादित वेळेसाठीच ही सवलत मंजूर केली आहे.
जयराम चाटे कडक पोलीस बंदोबस्तात तांबवा येथील आपल्या मूळ गावी दाखल झाला.
या प्रवासाचा आणि पोलीस सुरक्षेचा सर्व खर्च खुद्द आरोपीलाच करावा लागणार आहे.