'मला वेदना असह्य होतायत, आता मीच एकाएकाला मारून येते', संतोष देशमुखांच्या पत्नीचा टाहो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 19:17 IST2024-12-30T19:16:07+5:302024-12-30T19:17:15+5:30
Santosh Deshmukh Case : 'देवा सारख्या माझ्या पतीला अतिशय क्रूरपणे मारले, माझ्या लेकरांनी काय चूक केली होती?'

'मला वेदना असह्य होतायत, आता मीच एकाएकाला मारून येते', संतोष देशमुखांच्या पत्नीचा टाहो
Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. 22 दिवस उलटुनही संतोष देशमुख यांचे सर्व मारेकरी अद्याप पकडले गेले नाहीत, त्यामुळे राज्यातील नागरिकांचा प्रशासनाविरोधातील रोष वाढतोय. संतोष देशमुख यांना न्यायासाठी नुकताच बीडमध्ये सर्वपक्षीय मुक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर आता आज(दि.30) केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मस्साजोग येथे देशमुख कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी आठवलेंसमोर संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनीने टाहो फोडला.
दिवसाढवळ्या संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृण हत्या करण्यात आली. अनेक दिवस होऊन गेले, पण अद्याप या प्रकरणाचा मास्टरमाईंड पोलिसांच्या हाती आला नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली आहे. आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले देशमुख कुटुंबाच्या भेटीसाठी मस्साजोग येथे गेले. त्यांनी कुटुंबाचे सात्वन केले आणि त्यांना धीर दिला. यावेळी संतोष देशमुख यांच्या पत्नी आणि आईला अश्रू अनावर झाले.
यावेळी संतोष देशमुखांच्या पत्नी म्हणाल्या की, 'देवा सारख्या माझ्या पतीला त्यांनी अतिशय क्रूरपणे मारले. आम्हाला काय वेदना होताहेत, ते आमच्या जीवाला माहितीय. आरोपींना पकडण्यासाठी इतका वेळ का लागतोय? आता आमचा संयम संपत चाललाय. आता मी जाऊन एका एकाला मारून येते, मला वेदना असह्य होतायत. एवढी सध्या माझ्यात हिम्मत आलीय. माझ्या लेकरांनी काय चूक केली होती? त्यांचा आसा वनवास का केला?' अशा भावना त्यांनी व्यक्त केली.
राज्याची प्रतिमा कलंकित झाली: रामदास आठवले
ही घटना अत्यंत क्रूर आणि गंभीर असून देशमुख कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत रिपाई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे आठवले देशमुख कुटुंबास सांत्वन करताना म्हणाले. सीआयडीचा तपास योग्य दिशेने चालू आहे. मात्र, फरार आरोपिंची संपत्ती व बँकेचे खाते जप्त करून चालणार नाही. जलद गतीने तपास करून त्यांना तात्काळ अटक करावे. यासाठी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार असल्याचे मंत्री आठवले यांनी यावेळी सांगितले.