तरुणीचा फोटो, मोकारपंती व्हॉट्सअॅप ग्रुपचा स्क्रीनशॉट; ग्रुपमध्ये कोण-कोण, नावे आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 17:19 IST2025-03-12T17:17:19+5:302025-03-12T17:19:39+5:30
Santosh Deshmukh Mokarpanti whatsapp Group: सीआयडीने जे आरोपपत्र दाखल केले आहे, त्यात मोकारपंती ग्रुपची बरीच माहिती देण्यात आली आहे. कोणते लोक त्या ग्रुपमध्ये आहेत, त्यांची नावेही देण्यात आली आहे.

तरुणीचा फोटो, मोकारपंती व्हॉट्सअॅप ग्रुपचा स्क्रीनशॉट; ग्रुपमध्ये कोण-कोण, नावे आली समोर
Santosh Deshmukh Krushna Andhale News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना काही व्हिडीओ कॉल एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर केले गेले होते. चार वेळा व्हिडीओ कॉल करून संतोष देशमुख यांची मारहाण करून कशी अवस्था केली आहे, याची माहिती ग्रुपमधील इतर लोकांना दिली गेली होती. मोकारपंती असे त्या व्हॉट्सअॅप ग्रुपचे नाव असून, आरोपपत्रात त्याचा स्क्रीनशॉटही जोडला गेला आहे. या ग्रुपचा डीपी (डिस्प्ले फोटो) एका तरुणीचा फोटो ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या ग्रुपमध्ये कोण कोण सदस्य आहेत? हत्या झाली त्यावेळी कधी कधी व्हिडीओ कॉल केले गेले याची माहितीही आरोपपत्रात नमूद करण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मोकारपंती व्हॉट्सअॅपमध्ये एकूण १४ सदस्य आहेत. या ग्रुपचा अॅडमिन स्वतः कृष्णा आंधळे आहे. जयराम चाटे हाही या ग्रुपमध्ये होता. पण, ज्यावेळी संतोष देशमुख यांना मारहाण केली जात होती. त्यावेळी चार व्हिडीओ कॉल केले गेले. ते सर्व कॉल कृष्णा आंधळेने केले होते.
कृष्णा आंधळेने कधी कधी केले व्हिडीओ कॉल?
संतोष देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. ३.३० वाजता त्यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर मोकारपंती व्हॉट्सअॅप ग्रुपवर पहिला कॉल ५ वाजून १४ मिनिटांनी करण्यात आला, जो ४४ सेकंदांचा होता.
दुसरा व्हिडीओ कॉल ५ वाजून १६ मिनिटांनी करण्यात आला, जो ४५ सेकंदांचा होता. तिसरा व्हिडीओ कॉल ५ वाजून १९ मिनिटांनी करण्यात आला. या कॉलचा कालावधी २ मिनिटं ३ सेकंद होता. तर चौथा कॉल ५ वाजून २६ मिनिटांनी करण्यात आला होता. जो २ मिनिटे आणि ४४ सेकंदांचा होता.
डीपीवर तरुणीचा फोटो?
आरोपपत्रात असा उल्लेख करण्यात आला आहे की, मोकारपंती व्हॉट्सअॅप ग्रुपचा डीपी टू पीस कपडे परिधान केलेली एक तरुणीचा आहे. महेश केदार, जयराम चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतिक घुले यांच्यासह १४ जण या ग्रुपचे सदस्य आहेत. या ग्रुपवर ज्यावेळी कॉल केले गेले, त्यावेळी वाल्मीक कराडही ते बघत होता, असा दावा आधीच आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
कृष्णा आंधळे म्हणाला, हाच तो सरपंच
कृष्णा आंधळेंने मोकारपंती ग्रुपवर व्हिडीओ कॉल केला. बेदम मारहाणीमुळे जखमी झालेल्या संतोष देशमुख यांच्याजवळ त्याने कॅमेरा नेला. तीन वेळा त्यांच्या चेहऱ्याजवळ कॅमेरा नेला आणि ग्रुपमधील लोकांना दाखवला.
"हाच तो मस्साजोगचा सरपंच आहे, जो त्या दिवशी सुदर्शन भय्याला आणि आपल्या पोरांना आडवा आला होता", असे कृष्णा आंधळे म्हणाला. ही माहिती ग्रुपचा सदस्य असलेल्या दत्ता मैंद याने सीआयडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
हे बघून ग्रुपमधील गणेश बसवर याने मारू नका असं सांगितले. तो कृष्णा आंधळेला म्हणाला, "वाघ्या, लाई मारला आहे. आता बास करा, त्या सरपंचाला मारायचे." असा संवाद त्या व्हिडीओ कॉलवेळी झाल्याचे आरोपपत्रात म्हटलेले आहे.
एका व्हिडीओ कॉलमध्ये संतोष देशमुख हे काळ्या स्कॉर्पिओ गाडीत जखमी अवस्थेत पडून आअसल्याचे दिसत आहे. जखमा झाल्याने ते रक्तबंबाळ झालेले आहेत. त्याची पाठ काळी-निळी पडल्याचेही दिसत आहे.