...तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही; बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून संभाजीराजे संतापले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 20:28 IST2024-12-14T20:25:24+5:302024-12-14T20:28:54+5:30
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासात होत असलेल्या दिरंगाईवरून संभाजीराजेंनी सरकारला आक्रमक इशारा दिला आहे.

...तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही; बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून संभाजीराजे संतापले!
Sambhajiraje Chhatrapati ( Marathi News ) :बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आज स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीनंतर संभाजीराजेंनी सरकारला आक्रमक इशारा दिला आहे. "आत्येभावाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तीन तास मजा पाहिली. आता एका पोलिसाला निलंबित केलं आहे आणि एकाला सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. एवढ्यावर आम्ही गप्प बसणार नाही. या पोलिसांनाही सहआरोपी करा. जो आरोपी सुदर्शन घुले फरार आहे, त्याला या जिल्ह्यातील माजी मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांचं पाठबळ असतं. तो घुले सहा दिवसांपासून फरार आहे, त्याला धनंजय मुंडेंनी सरेंडर व्हायला सांगितलं पाहिजे. धनंजय मुंडे यांच्या पक्षाचा तालुकाध्यक्ष विष्णू चाटे हादेखील या प्रकरणात आरोपी आहे. या प्रकरणातील त्या वाल्मिक कराडला घेऊन धनंजय मुंडे हे मुख्यमंत्र्यांसहित इतर मंत्र्यांसोबत फोटो काढतात. आरोपींना अटक झाली नाही तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही," असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.
संभाजीराजे पुढे म्हणाले की, "संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली आहे. ही घटना ऐकून मी गहिवरून गेलो आहे. बीड जिल्हा आता बिहारच्या मार्गावर चालला आहे का, असा प्रश्न पडतोय. एका सर्वसामान्य घरातील संतोष देशमुख यांची सरपंचपदाची ही तिसरी टर्म होती. हा प्रामाणिक माणूस वाद सोडवण्यासाठी पवनचक्की कार्यालयापाशी गेला होता. तिथं एका बौद्ध समाजाच्या व्यक्तीला दमदाटी करण्यात आली होती. पण मध्यस्थी करणाऱ्या संतोष देशमुखची हत्या करण्यात आली."
दरम्यान, जोपर्यंत या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक होत नाही आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्री करू नये, अशी विनंती संभाजीराजेंनी केली आहे. तसंच "माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, तुम्ही जातीने लक्ष घाला. पोलिसांसमोर या गोष्टी घडलेल्या आहेत. तरीही पोलिसांनी लवकर गुन्हा नोंद केलेला नाही. या प्रकरणात एसआयटीची स्थापना करा आणि त्यामध्ये स्थानिक पोलीस अधिकारी न देता बाहेरचे अधिकारी द्या," अशी मागणीही संभाजीराजेंकडून करण्यात आली आहे.