संयम सुटतोय, राग अनावर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:33 AM2018-12-22T00:33:50+5:302018-12-22T00:34:20+5:30

अनैतिक संबंध, चारित्र्यावर संशय, व्यसन, दारु, द्वेष, मत्सर, सूडभावना यासारख्या क्षुल्लक कारणावरुन माणूसच माणसाच्या जीवावर उठला आहे. २०१८ मध्ये तब्बल ४५ जणांची निर्घृण हत्या झाली आहे. सरासरी आठ दिवसाला जिल्ह्यात एक खून होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

Restraint, anger, turbulence ..! | संयम सुटतोय, राग अनावर..!

संयम सुटतोय, राग अनावर..!

Next
ठळक मुद्देआठ दिवसांनी एक खून : २०१८ मध्ये ४५ जणांची निर्घृण हत्या; कारणे मात्र अतिशय किरकोळ

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अनैतिक संबंध, चारित्र्यावर संशय, व्यसन, दारु, द्वेष, मत्सर, सूडभावना यासारख्या क्षुल्लक कारणावरुन माणूसच माणसाच्या जीवावर उठला आहे. २०१८ मध्ये तब्बल ४५ जणांची निर्घृण हत्या झाली आहे. सरासरी आठ दिवसाला जिल्ह्यात एक खून होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
नागरिकांना राग अनावर होत असल्याने त्यांचा संयम सुटत असून, ते जीव घेण्यासारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे दिसून येते. वाढत्या गुन्हेगारीवरुन नागरिकांना कायद्याचा धाकच राहिला नसल्याचे दिसते.
दोन दिवसांपूर्वी बीड शहरातील तेलगाव नाक्यावर सुमित वाघमारे या २५ वर्षीय युवकाचा मेहुण्यानेच भर रस्त्यावर धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हीच घटना समोर ठेवून वार्षिक आढावा घेतला असता, वर्षभरात तब्बल ४५ जणांचा खून झाल्याचे समोर आले. इतरांसोबतचे अनैतिक संबंध, एकमेकांवरील चारित्र्यावर संशय, दारुसाठी पैसे न देणे, रस्त्यावर उभा राहणे, संपत्तीवरुन वाद, व्यक्तिगत वाद, जेवण व्यवस्थित न देणे, जुने भांडण आदी क्षुल्लक कारणावरून लोक एकमेकांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे.
कान्हापूरमध्ये दारुसाठी खून
वडवणी तालुक्यातील कान्हापूर येथे दारुसाठी पैसे न दिल्याने एका युवकाचा गावातीलच मित्राने खून केला होता. त्यानंतर वाद निर्माण झाला होता. पोलिसांनी हे प्रकरण हाताळून आरोपीला तात्काळ अटक केली अन् प्रकरण शांत केले होते.
रस्त्यात थांबल्याने नातेवाईकांनीच काढला काटा
पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत बार्शी नाक्यावर एक व्यक्ती रस्त्यावर थांबला म्हणून नात्यातीलच तिघांनी त्याचा दगडाने ठेचून खून केला होता. हे प्रकरणही चांगलेच चर्चेत राहिले.
राजूरीत दिवसाढवळ्या खून
बीड ग्रामीण ठाणेहद्दीतील राजुरी येथे बहीर नामक व्यक्तीचा दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने वार करुन खून केला होता. मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. खून दाखल करण्यासह आरोपींना अटक करण्याची मागणी नातेवाई-कांनी केली होती. आरोपींना अटक केल्यानंतर हे प्रकरण शांत झाले.
....म्हणून पत्नीला जाळून मारले !
पेठ बीड पोलीस ठाणेहद्दीत २६ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी सहा वाजता अय्यूब पठाण हा दारुच्या नशेत तर्रर्र होता. पत्नी घरकाम करीत होती. सानिया व समीर ही मुले बाहेर खेळत होती. यावेळी अय्यूबने पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. मात्र, आजारी असल्याने पत्नी सायरा हिने त्यास नकार दिला. यावेळी वासंनाध अय्यूबला राग अनावर झाला अन् त्याने रॉकेल अंगावर ओतून सायराला पेटवून दिले. यात तिचा मृत्यू झाल्याने अय्यूबवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
हुंड्यासाठी गर्भवतीचा आवळला गळा
बीड तालुक्यातील हिंगणी खुर्द येथे हुंड्यात राहिलेले दीड लाख रुपये माहेरहून घेऊन ये असे म्हणत पूनम अशोक तांदळे या गर्भवतीचा गळा आवळून खून केला. गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक झाले होते. त्यांनी शवविच्छेदनही रोखल्याने तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी सासरच्या चौघांविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस खात्यांसमोर एक नवीन आव्हान उभे ठाकले आहे.
निर्घृण कृत्य : २० दिवसांत तिघांची हत्या
चालू महिन्यात २० डिसेंबरपर्यंत तिघांचा खून झाला आहे. यामध्ये आष्टी तालुक्यातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा, माजलगाव तालुक्यातील शहाजानपूर येथे पत्नीचे प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केला आणि दोन दिवसांपूर्वी तेलगाव नाक्यावर पे्रमप्रकरणातून सुमित वाघमारेची हत्या झाली. अशा तीन घटना घडल्या आहेत.

Web Title: Restraint, anger, turbulence ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.