बीड जिल्ह्यात पावसाचा पुन्हा कहर; आष्टी-शिरूरला तडाखा, नागरिकांनी रात्र जागून काढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 16:55 IST2025-09-23T16:54:09+5:302025-09-23T16:55:36+5:30
कोणी वाहून गेले तर कोणाला जीवदान; पावसाला शिरूरला तडाखा; घरात पाणी, पिकेही पाण्याखाली

बीड जिल्ह्यात पावसाचा पुन्हा कहर; आष्टी-शिरूरला तडाखा, नागरिकांनी रात्र जागून काढली
बीड : मागील आठवड्यात झालेल्या ढगफुटीसदृष्य पावसाने आष्टी तालुक्यात हाहाकार माजवला होता. अनेकांचा जीव गेला होता, तर काहींना जीवदान देण्यात आले होते. त्यानंतर रविवारी रात्री झालेल्या पावसानेही पुन्हा हाहाकार माजवला. आष्टीसोबतच शिरूरलाही याचा फटका बसला. सिंदफना नदी पात्राला महापूर आल्याने बाजारपेठ पाण्याखाली गेली. अनेकांच्या दुकानात, घरात पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले. लोकांनी जीव मुठीत धरून रात्र काढली. हे पाणी ओसरत नाही तोच पुन्हा सोमवारी सायंकाळी पावसाने सुरुवात केली. गेवराईसह इतर भागांत जोरदार पाऊस झाला. बीडमध्येही रविवारी रात्री झालेल्या पावसाने अनेक मार्गांवर पाणी साचले होते.
बीडमध्ये रस्त्यांवर पाणी
बीड शहरातील अनेक भागात नाल्या नसल्याने आणि नगर पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी रस्त्यांवर आले. धांडे नगरसह इतर भागातील लोकांना पाण्यामुळे ये-जा करणे बंद झाले होते. या भागातील लोकांनी संताप व्यक्त करत रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसूनच आंदोलन केले. तसेच केएसके कॉलेजसमोरही नाल्यातील पाणी रस्त्यांवर आले. जालना रोडवरही पाणी रस्त्यावर आले. अनेक भागात दुकान, घरात पाणी शिरल्याने हाल झाल्याचे पाहायला मिळाले. बीड पालिकेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी सोमवारी दुपारी पाणी आलेल्या भागांची पाहणी केली.
आतापर्यंत ७११.२ मिमी पाऊस
बीड जिल्ह्यात जून ते २१ सप्टेंबर २०२५ रोजी पर्यंत ७११.२ मिमी पाऊस झाला आहे, तर मागच्या वर्षी २१ सप्टेंबर रोजीपर्यंत ७०४ मिमी पाऊस झाला होता. सरासरीच्या तुलनेत १४५ मिमी अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून सतत पाऊस होत असल्याने पर्जन्यमानाची आकडेवारी वाढत चालली आहे. मागच्या वर्षी जेवढा पाऊस सप्टेंबरपर्यंत झाला होता, तेवढाच पाऊस यंदा सुद्धा झाला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
जिल्ह्यातील २९ मंडळांत अतिवृष्टी
जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे २९ मंडळांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये बीड तालुक्यातील राजुरी मंडळामध्ये (८२.८ मिमी), पेंडगाव (७०.५ मिमी), मांजरसुंबा (९०), चौसाळा (९५.५), नेकनूर (६६.३), लिंबागणेश (१०७.३), येळंबघाट (६६.३), चऱ्हाटा (८२.८), पारगाव सिरस (८२.८), पाटोदा तालुक्यातील पाटोदा मंडळामध्ये (७४.३), अंमळनेर (६७), आष्टी तालुक्यातील दौलावडगाव मंडळामध्ये (८०), धामणगाव (६७.५), डोईठाण (६७), धानोरा (६५.८), दादेगाव (६५.८), गेवराई तालुक्यातील गेवराई मंडळामध्ये (७९.३), धोंडराई (८७.३), उमापूर (६७), चकलंबा (६७), रेवकी (७७.८), तलवाडा (११५.३), धारूर तालुक्यातील धारूर मंडळामध्ये (८६.८), शिरूर कासार तालुक्यातील शिरूर मंडळामध्ये (६७.३), रायमोहा (६८.८), तिंतरवणी (६७), ब्रह्मनाथ येळंब (६७.३), गोमळवाडा (६७), खालापुरी (६८.८ मिमी) अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
मांजरा प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १०:३० वाजता धरणाचे गेट क्रमांक १ आणि ६ हे ०.२५ मीटरने उघडण्यात आले. सध्या धरणाचे एकूण ६ दरवाजे सुरू असून, त्यातून मांजरा नदीपात्रात २०१५७.७७ क्युसेक (५७०.८८ क्युमेक्स) इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात येणाऱ्या पाण्याच्या पातळीनुसार विसर्ग वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे मांजरा नदीकाठच्या गावांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच माजलगाव धरणाचेही सोमवारी सकाळी ११ वाजता ११ दरवाजे ०.५० मीटरने वाढवण्यात आले होते.