माजलगावात आमदार व भुजल अधिकाऱ्याच्या स्वाक्षरी अभावी रेंगाळले टँकरचे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 18:34 IST2019-01-31T18:34:10+5:302019-01-31T18:34:53+5:30
टँकरचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे न पाठवता उपविभागीय अधिकाऱ्यांनाच मंजुरीचे अधिकार आहेत.

माजलगावात आमदार व भुजल अधिकाऱ्याच्या स्वाक्षरी अभावी रेंगाळले टँकरचे प्रस्ताव
माजलगाव (बीड) : तालुक्यातील पाच गावचे टँकरचे प्रस्ताव आमदार व भुजल अधिकाऱ्याच्या स्वाक्षरी अभावी रेंगाळले आहेत.यामुळे येथील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
शासनाने दुष्काळाची दाहकता पाहता टँकरचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे न पाठवता उपविभागीय अधिकाऱ्यांनाच मंजुरीचे अधिकार दिले. परंतू भुजल विभागाच्या अहवालानंतरच टँकरला मंजुरी दिली जाते. माजलगाव तालुक्यात सात टँकरचे प्रस्ताव आले असून धर्मेवाडी ,शहापुर मजरा येथे टँकर सुरु करण्यात आले आहेत. 4 जानेवारीला गुजरवाडी तर 8 जानेवारी रोजी जायकोवाडीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आले आहेत.
वास्तविक पाहता टँकरचे प्रस्ताव आठवडाभरात मंजुर होणे आवश्यक आहे परंतू आमदार आर.टी.देशमुख यांची स्वाक्षरी न झाल्याने या गावचे प्रस्ताव मागील एक महिन्यापासून धुळखात पडून आहेत. तर बाभळगाव, भाटवडगाव, ईरला डुब्बा येथील प्रस्ताव तीन आठवड्यापासून भुजल अधिकाऱ्याच्या व आमदारांच्या स्वाक्षरी अभावी मंजुर झाले नाहीत. यामुळे येथील ग्रामस्थांना भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. याप्रकरणी, पंचायत समितीवर खापर फोडणे चुकीचे असून सत्ताधाऱ्यांना दुष्काळाचे गांभीर्य नसल्याचा आरोप पंचायत समिती सभापती अलका जयद्रत नरवडे यांनी केला आहे.