शवविच्छेदन रिपोर्टवरून मयत डॉक्टरवर दबाव आणला जात होता; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 13:54 IST2025-11-10T13:39:25+5:302025-11-10T13:54:31+5:30
मुख्यमंत्री पोलिसांच्या माहितीवरून निवेदन देतात, ते नंतर चुकीचे ठरते. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातही असेच घडले होते.

शवविच्छेदन रिपोर्टवरून मयत डॉक्टरवर दबाव आणला जात होता; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
वडवणी : फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात, शवविच्छेदन रिपोर्टवरून मयत डॉक्टरवर दबाव आणला जात होता, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. रविवारी दुपारी मयत डॉक्टर कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची एसआयटीने चौकशी करण्याची मागणी केली.
सदरील भेटीनंतर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, या प्रकरणात मयत डॉक्टरवर दबाव आणला जात असल्याचे स्पष्ट दिसते. हा दबाव शवविच्छेदन रिपोर्टसंदर्भात होता. त्यामुळे विशेष तपास पथकाने (एसआयटी) डॉक्टरांच्या देखरेखीखाली झालेल्या सर्व शवविच्छेदनांची चौकशी करावी, जेणेकरून त्यांच्यावर दबाव होता की नाही हे स्पष्ट होईल. दबाव आणणारे डॉक्टर, पोलिस, राजकीय नेते की सामाजिक कार्यकर्ते की इतर कोणी होते याचा शोध घेण्यासाठी डॉक्टरांना आलेले सर्व फोन कॉल्स तपासण्याची मागणीही त्यांनी केली. या चौकशीतूनच आत्महत्येमागील खरे कारण समोर येईल, असेही ते म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर टीका करताना आंबेडकर म्हणाले की, मुख्यमंत्री पोलिसांच्या माहितीवरून निवेदन देतात, ते नंतर चुकीचे ठरते. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातही असेच घडले होते. त्यामुळे चुकीची माहिती देणाऱ्या पोलिसांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, तसेच शासनाने पीडित कुटुंबीयातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक सदस्य आणि फलटण न्यायालयातील वकील मोरे हे या प्रकरणात कुटुंबीयांना कायदेशीर मदत करतील आणि आरोपींना शिक्षा होईपर्यंत वंचित बहुजन आघाडी कुटुंबासोबत राहील, असे आश्वासनही आंबेडकरांनी दिले. यावेळी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे, वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
तेजस्वी सातपुतेंनी घेतली भेट
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीच्या प्रमुख आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी शनिवारी सकाळी डॉक्टरांच्या गावी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी तपास योग्य दिशेने सुरू असल्याचा विश्वास कुटुंबीयांना दिला आणि घटनेसंदर्भात अधिक माहिती घेतली.
बीडच्या सामाजिक सलोख्यावर आंबेडकरांची चिंता
प्रकाश आंबेडकर यांनी बीड जिल्ह्यातील बिघडत चाललेल्या सामाजिक सलोख्यावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, बीडमध्ये मराठा आणि वंजारी समाजातील वाद राजकीय मंडळींकडून विकोपाला नेण्याचा प्रयत्न होत आहे. जात आणि धर्माच्या आधारावर शासन काम करत आहे, हे देशाच्या भवितव्यासाठी धोकादायक आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनी बीडमध्ये लक्ष घालून हे प्रकरण तातडीने मिटवावे.