Walmik Karad Gang: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. बीडच्या जिल्हा कारागृहातून धक्कादायक प्रकार समोर आला असून वाल्मिक कराड गँगची दहशत पुन्हा वाढल्याची चर्चा रंगली आहे. २४ तासांत बीड जिल्हा कारागृहात घडलेल्या घडामोडींनी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. एका कैद्याला झालेल्या मारहाणीचे प्रकरण आता केवळ गुन्हेगारीपुरते मर्यादित न राहता, त्याला निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण वळण मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
बीड जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक ६ मध्ये जागेच्या वादावरून अझर अब्दुल रहमान पठाण या कैद्याला सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि शंकर शेप यांनी मारहाण केल्याचा आरोप झाला. मारहाण करणारे हे तिन्ही आरोपी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याचे साथीदार आहेत. या घटनेनंतर अझरची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, ज्यामध्ये त्याने कारागृह प्रशासनावर लाचखोरीचा आणि मारहाणीचा गंभीर आरोप केला होता.
ऑडिओ क्लिपमधील धक्कादायक दावे
व्हायरल क्लिपमध्ये अझरने दावा केला की, "जेल प्रशासनाने पैसे खाल्ले असून ते माझं काहीही ऐकत नाहीत. जेलरने मला तक्रार केल्यास जेल बदली करण्याची धमकी दिली." सर्वात खळबळजनक बाब म्हणजे, या क्लिपमध्ये मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याबाबतचा उल्लेख असल्याने खळबळ उडाली होती.
कराडच्या बदनामीसाठी दबाव; त्या कैद्याचा मोठा खुलासा
मात्र, गुरुवारी सकाळी या प्रकरणाला पूर्णपणे वेगळे वळण मिळाले. मारहाण झाल्याचा दावा करणाऱ्या अझर पठाणने कारागृह प्रशासनाकडे लेखी अर्ज देत खळबळजनक खुलासा केला. "माझा आणि प्रतीक घुलेचा वाद आपसात मिटला होता. पण, कारागृह कर्मचारी दीपक पाटील आणि इतर काही कैद्यांनी माझ्यावर दबाव टाकला. वाल्मिक कराड यांची बदनामी करण्यासाठी मला बाहेर फोन करून खोटी माहिती पसरवायला भाग पाडले," असे कैद्याने म्हटले.
सरपंच निवडणुकीचे कनेक्शन
अझरच्या खुलाशानुसार, मस्साजोग येथे दोन-तीन दिवसांत सरपंचपदासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी उमेदवार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाल्मिक कराड यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी दादा खिंडकर नावाच्या व्यक्तीने कारागृहात निरोप धाडला होता, असा आरोप अझरने केला आहे. खिंडकर हा संतोष देशमुखांच्या भावाचा साडू असल्याचे समजते.
प्रशासनाची भूमिका आणि राजकीय आरोप
कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी स्पष्ट केले की, संबंधित कैद्याने आपल्याला कोणतीही तक्रार नसल्याचे लेखी दिले आहे. मात्र, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी प्रशासनावर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
Web Summary : Beed jail sees political drama as an inmate initially accuses Walmik Karad's gang of assault and jail corruption, then retracts, alleging pressure to defame Karad amid a local election.
Web Summary : बीड जेल में राजनीतिक नाटक देखने को मिला क्योंकि एक कैदी ने पहले वाल्मीक कराड के गिरोह पर मारपीट और जेल भ्रष्टाचार का आरोप लगाया, फिर पलट गया, और स्थानीय चुनाव के बीच कराड को बदनाम करने का दबाव होने का आरोप लगाया।