मुंडे घराण्यातून नवे नेतृत्व; गोपीनाथ मुंडेंची धाकटी कन्या यशश्रीचीही राजकारणात 'एन्ट्री'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 09:15 IST2025-07-15T09:10:16+5:302025-07-15T09:15:01+5:30

वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत अर्ज दाखल : पंकजा, प्रीतम मुंडे आधीच सक्रीय

New leadership from the Munde family; Gopinath Munde's younger daughter Yashashree Munde also enters politics | मुंडे घराण्यातून नवे नेतृत्व; गोपीनाथ मुंडेंची धाकटी कन्या यशश्रीचीही राजकारणात 'एन्ट्री'

मुंडे घराण्यातून नवे नेतृत्व; गोपीनाथ मुंडेंची धाकटी कन्या यशश्रीचीही राजकारणात 'एन्ट्री'

- सोमनाथ खताळ

बीड : दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या कन्या यशश्री मुंडे यांनी वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून राजकारणात प्रवेश केला आहे. वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात त्यांनी पदार्पण केले आहे. या आधी पंकजा मुंडे, डॉ. प्रीतम मुंडे या दोन बहिणींसह गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे हेदेखील राजकारणात सक्रिय आहेत.

यशश्री मुंडे या व्यवसायाने वकील आहेत. त्यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून एलएलएम पदवी घेतली आहे. त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे आणि डॉ. प्रीतम मुंडे या राजकारणात अगोदरच स्थापित आहेत. पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या सदस्या असून, सध्या महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत. तर प्रीतम मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून काम पाहिले आहे. दरम्यान, या बँक निवडणुकीत एकूण १७ जागांसाठी ७१ अर्ज प्राप्त झाले आहेत. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने यापूर्वी बँकेच्या संचालक मंडळावर बिनविरोध निवड मिळवली होती. या निवडणुकीत प्रीतम मुंडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला असून, महिला गटात त्यांना बिनविरोध विजय मिळण्याची शक्यता आहे.

पंकजांनी मुलालाही केले पुढे
गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होत आहे. पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात त्यांचा मुलगा आर्यमन याला सार्वजनिक व्यासपीठावर आणल्याचा संदर्भही या संदर्भात दिला जात आहे. यशश्री मुंडे यांच्या प्रवेशामुळे वैद्यनाथ बँकेची निवडणूक आणि स्थानिक राजकारण चर्चेत आले आहे.

मुंडे बहीण-भाऊ एकत्र
आतापर्यंत विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात भाजप नेत्या पंकजा मुंडे व राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे लढले होते. परंतु यावेळी राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने पंकजा मुंडे यांना लाेकसभेची उमेदवारी दिली. यात बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला होता. तर परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला. पंकजा यांच्यामुळे लोकसभेतून बाजूला गेलेल्या डॉ. प्रीतम मुंडे अजूनही राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.

Web Title: New leadership from the Munde family; Gopinath Munde's younger daughter Yashashree Munde also enters politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.