निसर्गाचा कोप! शेतात काम करताना झाडावर पडली वीज; आडोशाला थांबलेल्या शेतकऱ्याचा अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:39 IST2026-04-01T12:38:54+5:302026-04-01T12:39:12+5:30
कुटुंबाचा आधार हिरावला गेल्याने गावकरी सुन्न झाले आहेत.

निसर्गाचा कोप! शेतात काम करताना झाडावर पडली वीज; आडोशाला थांबलेल्या शेतकऱ्याचा अंत
परळी (जि. बीड): परळी तालुक्यातील सबदराबाद परिसरात सोमवारी रात्री निसर्गाने घातलेल्या घातामुळे एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अवकाळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटापासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबलेल्या बालाजी बाबूराव चव्हाण (वय ३७) यांच्यावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच अंत झाला. या घटनेसह तालुक्यातील दुसऱ्या एका घटनेत शेतकऱ्याचा बैलही दगावला असून, बळीराजावर अस्मानी संकट ओढवले आहे.
या घटनेमुळे सबदराबाद आणि परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून, चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
झाडाखालचा आसरा ठरला काळ
बालाजी चव्हाण हे सोमवारी रात्री आपल्या शेतात काम करत होते. अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याने, स्वतःचा बचाव करण्यासाठी ते जवळच असलेल्या एका झाडाखाली थांबले. मात्र, दुर्दैवाने त्याच झाडावर वीज कोसळली. या भीषण दुर्घटनेत बालाजी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले आणि एक भाऊ असा मोठा परिवार असून कुटुंबाचा आधार हिरावला गेल्याने गावकरी सुन्न झाले आहेत.
पशुधनालाही विजांचा फटका
विजांच्या कडकडाटाचा फटका केवळ मानवी जीवितालाच नाही, तर पशुधनालाही बसला आहे. तालुक्यातील कौडगाव हुडा येथील शेतकरी धनराज आश्रोबा फपाळ यांचा एक बैल वीज कोसळल्याने दगावला. शेतीचा मुख्य आधार असलेला बैल गेल्याने फपाळ कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, प्रशासनाने त्यांनाही मदत देण्याची मागणी होत आहे.
प्रशासनाचे पंचनाम्याचे आदेश
घटनेची माहिती मिळताच परळीचे प्रभारी तहसीलदार विनोद रणवारे यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेला घटनास्थळी पाठवून पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. या नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आला आहे. "बाधित कुटुंबांना शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून तातडीने आर्थिक मदत मिळावी," अशी आर्त साद ग्रामस्थांनी प्रशासनाला घातली आहे.