मुंडे घराण्याचा सच्चा समर्थक; मृतदेह पाहून खासदार प्रीतम मुंडे गहिवरल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 16:20 IST2022-10-11T16:18:30+5:302022-10-11T16:20:01+5:30
आज सकाळी बीडचे भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी गोळी झाडून आत्महत्या केली.

मुंडे घराण्याचा सच्चा समर्थक; मृतदेह पाहून खासदार प्रीतम मुंडे गहिवरल्या
बीड: आज सकाळी बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली. बीडचे भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी (Bhagirath Biyani) त्यांच्या राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडललेले आढळले. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे सांगण्यात येत आहे. बियाणी यांच्या मृतदेहाशेजारी, त्यांची बंदूक आढळली. दरम्यान, भगीरथ यांच्या मृत्यूची बातमी कळताच बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. यावेळी आपल्या एका जवळच्या कार्यकर्त्याचा मृतदेह पाहून प्रीतम यांना गहिवरुन आले.
भगीरथ बियाणी भाजपचे अंत्यत निष्ठावंत कार्यकर्ते होते. सोमवारी रात्री उशिरापर्यंत त्यांनी कुटुंबासोबत गप्पा मारल्या. नंतर ते आपल्या खोलीत जावून झोपले. सकाळी त्यांच्या खोलीत पाहिले तर बियाणी रक्ताच्या थारोळ्यात आढळले. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ बीड शहरातील एका खासगी रूग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला.
या घटनेची माहिती समजताच खा.प्रीतम मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांच्यासह शेकडो, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रूग्णालयाकडे धाव घेतली. रूग्णालयाबाहेर मोठा जमाव जमला होता. आत्महत्येमागचे कारण काय? याचा तपास पोलीस घेत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, प्रीतम मुंडे रुग्णालयात बियाणी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पोहोचल्या. मात्र मृतदेह पाहूनच त्या अस्वस्थ झाल्या. त्यांना गहिवरुनही आले. यावेळी प्रितम यांनी बियाणींच्या कुटुंबाला आधार दिला. जवळच्या कार्यकर्त्याच्या अशा निधनानंतर प्रितम मुंडे यांनी त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.