सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा निशाणा; परभणीत मूक मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 13:15 IST2025-01-05T13:14:29+5:302025-01-05T13:15:25+5:30
संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा निशाणा; परभणीत मूक मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी/बीड : मस्साजोग सरपंच हत्या व खंडणी प्रकरणावरून सत्ताधारी, विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधला जात आहे. हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी शनिवारी परभणीत भव्य मोर्चा निघाला. यावेळी हत्या प्रकरणातील आरोपींना पुण्यात कोणी मदत केली, मदत करणाऱ्या मंत्र्याला कधी मंत्रीमंडळातून हाकलणार, असे सवाल करीत मोर्चास संबोधित करणाऱ्या नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. तर, बीडमध्येही माध्यमांशी बोलतानाही नेत्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
परभणीतील नूतन महाविद्यालय येथून काढण्यात आलेल्या मोर्चात संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह परिसरातील सर्वपक्षीय नेत्यांनी हजारो नागरिक सहभागी झाले होते. मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पोहोचल्यानंतर दुपारी चार वाजेपर्यंत भाषणे झाली. आमदार सुरेश धस म्हणाले की, एकही आरोपी सुटणार नाही. आरोपींचा आका अन् आकाचा आका याचाही नंबर लागू शकतो. फक्त या आरोपींना मकोका लावा, तसेच पीकविमा घोटाळ्याच्या परळी पॅटर्नमध्ये परभणीतही ४० हजार हेक्टरचा बोगस पीकविमा काढल्याचे सांगत त्यांनी परळी थर्मलच्या राखेचे कंत्राट वारंवार घेणाऱ्यांची यादीच वाचून दाखविली.
आरोपींना पुण्यात आश्रय कोणी दिला? : धनंजय देशमुख
बीड: ही संघटीत गुन्हेगारी आहे. यांच्यावर मोक्का लावावा. या प्रकरणात आणखी आरोपी वाढणार आहेत. समाजातील अशा विकृतीना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.
आतापर्यंतचे आरोपी पुण्यातच सापडत आहेत. त्यांना तेथे कोणी आश्रय देत आहे का?, असे प्रश्न संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांपुढे व्यक्त केले. जोपर्यंत अशा समूहाचा नायनाट होत नाही, तोपर्यंत भावाला न्याय मिळणार नाही, असेही ते म्हणाले.
रुग्णालयाचे सीसीटीव्ही तपासा : आ. क्षीरसागर
बीडचे आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, ६, ९ व ११ डिसेंबरचे फोन रेकार्ड व सीडीआर काढला, तर वाल्मीक कराडच नाही, तर अनेक जण रडावर येतील. प्रत्येक आरोपी पुण्यात सापडतो. कराड पुण्यातील एका रुग्णालयात ॲडमिट होऊन टीव्हीवर सर्व पाहत होता. त्या रुग्णालयाचे सीसीटीव्ही तपासा. बीड जिल्ह्यातील गुन्ह्यांचा तपास कराडच्या दिशेने गेला की, थांबतो. या प्रकरणाचा तपास होईपर्यंत मंत्री मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे.
चार्जशिटमध्ये त्रुटी राहू नये : खासदार जाधव
परभणीचे खासदार संजय जाधव म्हणाले, योग्य तपास करून चार्जशिट दाखल व्हावी. पुराव्याअभावी यांनी अनेक खून पचवले. त्यामुळे त्रुटी राहू नये. परळीची स्थिती बिहारला लाजवेल. नैतिक जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा.
मुंडेंना फिरू देणार नाही : जरांगे
संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना धक्का लागला, तर धनंजय मुंडेंना रस्त्याने फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. सगळे आरोपी पुण्यात सापडतात, याचा अर्थ त्यांना मंत्री सांभाळतात. आरोपींची नार्को टेस्ट करा व मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा, असे जरांगे म्हणाले.
जरांगे वैफल्यग्रस्त झाले आहेत. बीड सरपंच हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा खणखणीत इशारा दिला होता. यावर राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी जोरदार टीका केली. मनोज जरांगे हे वैफल्यग्रस्त झाले असून, त्यांच्या बोलण्याला फारसे महत्त्व देऊ नका, असे जयस्वाल म्हणाले.
समाजाने पाठीशी राहावे : वैभवी देशमुख
संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी म्हणाली की, आज मला माझ्या वडिलांचा तो हसरा चेहरा दिसत नाही. त्यांना आमच्यापासून हिरावले. आज समाज आमच्या पाठीशी उभा राहिला. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही येथे आलात. असाच तुमचा हात पाठीवर कायम राहू द्या.
माझ्याकडे अनेक पुरावे : करुणा शर्मा
आमदार धस यांनी दोन दिवसांपूर्वी करुणा शर्मा यांच्या वाहनात पिस्तूल ठेवणारे पोलिसच होते, असा दावा केला होता. यावर करुणा यांनी त्यांचे आभार मानत गुंडशाहीचा पर्दाफाश करण्याची मागणी त्यांनी आमदार धस यांच्याकडे केली. पिस्तूल ठेवण्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयातील मारहाणीपर्यंतचे पुरावे असल्याचेही सांगितले.
‘तो’ चालक म्हणतो...
- पुण्यात सीआयडीसमोर शरण येताना कराड ज्या वाहनातून आला, त्याचे मालक शिवलिंग मोराळे यांनीही याचा खुलासा केला. ते म्हणाले, शरण येणार असल्याचे समजताच मी पुण्याला गेलो. तेथे सुरक्षा असल्याने दूर थांबलो.
- एवढ्यात छोट्या गाडीतून ते आले आणि मला हात केला. मला त्रास होत असल्याने मोठ्या वाहनातून सोड, असे म्हणताच मी त्यांना सीआयडी कार्यालयात घेऊन गेलो.
पुण्यात अड्डा आहे का? - खा. बजरंग सोनवणे
सगळे आरोपी एकाच ठिकाणी सापडत असल्याने पुण्यात त्यांचा अड्डा आहे का? ते एवढ्या दिवस कोठे होते, त्यांच्या संपर्कात कोण होते, कोणाच्या घरी होते, त्यांना फोनवरून कोण बोलत होते, याची चौकशी करावी, असे खासदार बजरंग सोनवणे बीडमध्ये म्हणाले.