५३ टीएमसी पाणी आले तर मराठवाडा दुष्काळमुक्त होईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 19:25 IST2025-02-06T19:24:49+5:302025-02-06T19:25:32+5:30

समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात यावे

Marathwada will be drought-free if 53 TMC water is provided: Chief Minister Devendra Fadnavis | ५३ टीएमसी पाणी आले तर मराठवाडा दुष्काळमुक्त होईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

५३ टीएमसी पाणी आले तर मराठवाडा दुष्काळमुक्त होईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आष्टी/कडा (जि. बीड) : समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणावे लागेल. हे ५३ टीएमसी पाणी आले तर मराठवाड्याची पुढील पिढी दुष्काळ पाहणार नाही. दुष्काळ हा भूतकाळ होईल. एवढेच नव्हे तर चार नदीजोड प्रकल्पामुळे मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रदेखील दुष्काळमुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर आष्टी उपसा सिंचन योजनेचा क्र. ३ अंतर्गत शिंपोरा ते खुंटेफळ पाइपलाइन कामाची पाहणी तसेच बोगदा कामाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी दुपारी झाला. यावेळी जलसंपदामंत्री डाॅ. राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री पंकजा मुंडे, खा. बजरंग सोनवणे, आ. सुरेश धस, आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, आ.नमिता मुंदडा, आ. विजयसिंह पंडित, आ. नारायण पाटील आदींची उपस्थिती होती.

सर्व योजना सोलरवर टाकणार
राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सोलरवर टाकल्या जाणार आहेत. त्यामुळे वीजबिलाचा बोजा शेतकऱ्यांवर येणार नाही. जी १६ हजार मेगावॉट वीज लागते ती सर्व सोलरवर घेतली जाईल. याचे काम डिसेंबर २०२५ किंवा मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होईल. यामुळे ८ रुपये युनिटऐवजी ३ रुपयाने वीज मिळून ५ रुपये वाचतील. या वाचलेल्या पैशांतून घरगुती, औद्योगिक वापराची बिले कमी करू, असेही फडणवीस म्हणाले.

देशमुख हत्या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही
सरपंच परिषदेचे काही लोक भेटले. परंतु संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्या खपवून घेणार नाही. यात कोणीही असले तरी त्यावर कारवाई करणार. सर्वांनी एकत्रित येऊन गुण्यागोविंदाने नांदावे. नवीन बीड तयार करायचे आहे, असे म्हणत फडणवीस यांनी शांततेचे आवाहन केले.

मी धसांचा लाडका भाऊ : विखे पाटील
उपसा सिंचन कामासाठी ११ हजार ७२६ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. हे काम दोन टप्प्यात होत आहे. पहिल्या टप्प्यात ३३ हजार ४९५ हेक्टर आणि दुसऱ्या टप्यात ८७ हजार १८८ हेक्टरचे काम होईल. दुष्काळमुक्तीसाठी अधिकचे पाणी देऊ, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले, तर आ. सुरेश धस हे माझेपण लाडके भाऊ असल्याचे विखे पाटील म्हणाले.

मी मुख्यमंत्र्यांचा लाडका : सुरेश धस
काही लोक म्हणतात, जिल्ह्याची बदनामी केली. परंतु अनेक क्रांतिकारी नेते, अधिकारी जिल्ह्यात होते. परंतु ठरावीक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तींना पाठिंबा दिल्याने जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाली. पण संतोष देशमुख प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी मी कोणालाही सोडणार नाही, ही कणखर भूमिका सर्वांना आवडली. ते बिनजोड पहिलवान आहेत. मला मंत्री, पालकमंत्री नको; पण साडेसात टीएमसी पाणी द्या, अशी मागणी आ. सुरेश धस यांनी केली. प्रशांत बंब जसे लाडके आहेत, तसेच मीपण मुख्यमंत्र्यांचा लाडकाच आहे. माझे खूप लाड केल्याचेही ते म्हणाले. शेवटी ‘दिवार’ चित्रपटातील डायलॉग मारत त्यांनी ‘मेरे पास देवेंद्र फडणवीस हैं’ असल्याचे सांगितले. तसेच राख, वाळू, गुटखामाफियांवर मकोका लावावा, अशी मागणीही आ. धस यांनी केली.

वचन ही मेरा शासन : पंकजा मुंडे
सुरेश धस हे चित्रपटातील डायलॉग मारतात. तसेच मीपण सांगते. देवेंद्र फडणवीस यांना ते आज बाहुबली म्हणत आहेत. काही वर्षांपूर्वी तेच मला शिवगामी म्हणत होते. शिवगामीचे ‘मेरा वचन ही मेरा शासन है’ हे वाक्य होते. त्यामुळे हेच माझं शासन आहे. मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे, बोलणं एक आणि करणं एक माझ्या रक्तात नाही, असे म्हणत मंत्री पंकजा मुंडे यांनी आ. सुरेश धस यांना अप्रत्यक्ष सुनावले. मी येणार नाही, असे अनेकांना वाटले. परंतु हा कार्यक्रम शासकीय आहे. शेतकऱ्यांच्या भविष्याचा आहे. मीपण मुख्यमंत्र्यांची लाडकी आहे. म्हणूनच तर हेलिकॉप्टरमधून आले, असे म्हणत आ. धस यांच्या ‘लाडका’ या शब्दाला प्रत्युत्तर दिले.

Web Title: Marathwada will be drought-free if 53 TMC water is provided: Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.