वाल्मिक कराडला मकोका व खून प्रकरणात आरोपी करा; देशमुख कुटुंबाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 21:01 IST2025-01-12T21:00:47+5:302025-01-12T21:01:47+5:30
देशमुख कुटुंबीय मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार; गावकऱ्यांनीही दिला सामूहिक आत्मदहनाचा इशारा

वाल्मिक कराडला मकोका व खून प्रकरणात आरोपी करा; देशमुख कुटुंबाची मागणी
केज(बीड): सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आत एक मोठी घडामोड समोर आली आहे. खंडणीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात यावा व त्याला सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सहआरोपी करावे, अशी मागणी देशमुख कुटुंबियांनी केलीआहे. या मागणीसाठी सोमवारी(13 जानेवारी) सकाळी 10 वाजल्यापासून संपूर्ण देशमुख कुटुंबीय मोबाईल टॉवरवर आंदोलन करणार असून, मागण्या मान्य न झाल्यास टॉवरवरून उडी मारून आपले जीवन संपवणार असल्याची उदविग्न भूमिका सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, यांनी प्रसार माध्यमासमोर व्यक्त केली. यामुळे आता प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला 35 दिवस झाले, तरीही कृष्णा आंधळे(रा. मैंदवाडी) हा आरोपी अद्यापही मोकाटच आहे. पोलीस निरीक्षकापासून ते मुखमंत्र्यांपर्यंत सर्व यंत्रनेवर आपण विश्वास ठेऊन त्यांना सर्व पुरावे सादर केले आहेत. परंतु आरोपीच्या मोबाईलचे सीडीआर काढले का? संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपीनी कॉल व व्हीडिओ कॉल कोणाला करण्यात आले? खंडणी ते खून प्रकरणातून कोणाला तरी वाचविण्यात येते काय? असे प्रश्न धनंजय देशमुख यांनी विचारले.
वाल्मीक कराडच्या अडचणी वाढणार, '१४१ हार्वेस्टर मशिनसाठी ८-८ लाख रुपये घेतले'; सुरेश धसांचा आरोप
तसेच, सरपंच देशमुख खून प्रकरनाच्या तपासाबाबत आपल्या माहिती दिली जात नाही. आरोपी सुटले तर त्यांच्या हाताने आपल्याला व कुटुंबियांना संपविण्यात येणार आहे. त्यापेक्षा आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आपणच मोबाईल टॉवरवर चढून वरून खाली उडी मारून आपले जीवन संपविण्याचा निर्णय गंभीर्यपूर्वक व विचारपूर्वक घेतल्याचे धनंजय देशमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
गावकरी सामूहिक आत्मदहन करणार..!
रविवारी रात्री साडेसात वाजता मस्साजोग येथील महादेव मंदिरासमोर देशमुख कुटुंबियांसह सर्व गावाकऱ्याची सामूहिक बैठक झाली. या बैठकीत गावाकऱ्यांनी सात मागण्या मांडल्या. या मागण्या मान्य न झाल्यास मकर संक्रातीच्या दिवशी महादेव मंदिरासमोर सर्व गावकरी अंगावर पेट्रोल ओतून, सामूहिक आत्मदहन करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना सोमवारी देण्यात येणार आहे. या निवेदनावर 23 गावाकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्रमुख मागण्या..!
- वाल्मिक कराडवर मकोका लावून, सरपंच हत्येत त्याला सह-आरोपी करा
- मोकाट कृष्णा आंधळेला अटक करा
- शासकीय वकील म्हणून ऍड उज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची नियुक्ती करा
- एसआयटीत पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची नियुक्ती करा
- तपासाची माहिती देशमुख कुटुंबियांना द्या
- पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन याला बडतर्फ करून सह-आरोपी करा
या मागण्याचे निवेदन गावाकऱ्यांनी तयार केले आहे.