Santosh Deshmukh बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी कारवाई; कट रचणारा आरोपी विष्णू चाटेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:04 IST2024-12-18T12:51:23+5:302024-12-18T13:04:28+5:30
सरपंच हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या चारवर पोहचली असून अजूनही तीन आरोपी फरार आहेत.

Santosh Deshmukh बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी कारवाई; कट रचणारा आरोपी विष्णू चाटेला अटक
Santosh Deshmukh Murder Case ( Marathi News ) :बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याला बेड्या ठोकल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे येत असताना बीड शहराजवळील लक्ष्मी चौक येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून चाटे याला अटक केली. त्यामुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या चारवर पोहचली असून अजूनही तीन आरोपी फरार आहेत. विष्णू चाटे याच्यावर सरपंच देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. तसंच पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणीही चाटे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी विष्णू चाटे याच्यासह इतर सहा जणांवर हत्येचा गुन्हा नोंदवला होता. तसंच पवनचक्की कंपनीच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि अन्य एका आरोपीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. सदर खंडणी प्रकरण आणि हत्या प्रकरणाचा परस्परसंबंध असल्याचं उघड झालं आहे. कारण पवनचक्की कंपनीच्या कार्यालयाबाहेर झालेल्या वादातून संतोष देशमुख यांची सोमवारी दुपारी निर्घृण हत्या करण्यात आली होती. पवनचक्की कंपनीबाहेर झालेल्या मारहाणीचा राग मनात ठेवून आरोपींनी सरपंच देशमुख यांचे अपहरण करून खून केल्याचे सांगितले जाते.
तीन आरोपींना अटक कधी?
सरपंच हत्या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असली तरी अद्याप तीन आरोपी फरार आहेत. यामध्ये सुदर्शन घुले याचाही समावेश आहे. सुदर्शन घुले हा वाल्मिक कराड यांच्या जवळचा व्यक्ती म्हणून ओळखला जातो.