माजलगाव हादरले! छत्तीसगडहून ऊसतोडीसाठी आलेल्या मजुरांच्या दोन मुलींवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 18:38 IST2026-01-01T18:37:32+5:302026-01-01T18:38:34+5:30
किराणा दुकानदार आणि ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

माजलगाव हादरले! छत्तीसगडहून ऊसतोडीसाठी आलेल्या मजुरांच्या दोन मुलींवर अत्याचार
बीड : माजलगाव तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. ऊसतोडणीसाठी छत्तीसगड राज्यातून आलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर स्थानिक नराधमांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलींच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील राज्यातील १४ कुटुंबे माजलगाव तालुक्यात ऊसतोडणीच्या कामासाठी आली आहेत. २४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जेव्हा मुलींचे वडील आणि नातेवाईक शेतात ऊसतोडणीच्या कामासाठी गेले होते, तेव्हा दोन अल्पवयीन मुली (वय १३ आणि १४ वर्षे) आपल्या झोपडीत एकट्याच होत्या. या संधीचा फायदा घेत गावातीलच किराणा दुकानदार गणेश राजेभाऊ घाटूळ आणि त्याचा मित्र ट्रॅक्टर चालक अशोक भास्कर पवार हे दोघे तिथे आले. त्यांनी दोन्ही मुलींना जबरदस्तीने ओढत नेले. गणेश घाटूळ याने एका मुलीला उसाच्या शेतात, तर अशोक पवार याने दुसऱ्या मुलीला कपाशीच्या शेतात नेऊन त्यांच्यावर अत्याचार केला. हे मुलींनी सांगताच ऊसतोड मजुरांनी पोलिस ठाणे गाठले. छत्तीसगडमधील पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गणेश घाटूळ आणि अशोक पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे ऊसतोड मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.
धमकावल्यामुळे घटना उशिरा उघड
अत्याचार केल्यानंतर "जर ही गोष्ट कोणाला सांगितली तर जीवे मारून टाकू," अशी धमकी आरोपींनी मुलींना दिली होती. या दहशतीमुळे घाबरलेल्या मुलींनी सुरुवातीला कोणालाही काही सांगितले नाही. मात्र, २८ डिसेंबर रोजी हिंमत एकवटून पीडित मुलीने आपल्या वडिलांना आपबीती सांगितली. त्यानंतर दुसऱ्या मुलीनेही आपल्यासोबत घडलेला प्रकार मामाला सांगितला.