Maharashtra Politics :'तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे'; संदीप क्षीरसागर यांची मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 15:59 IST2025-01-13T15:58:18+5:302025-01-13T15:59:30+5:30
Maharashtra Politics : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली.

Maharashtra Politics :'तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे'; संदीप क्षीरसागर यांची मोठी मागणी
Maharashtra Politics ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी राज्यभरातून होत आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित वाल्मीक कराड याला तपास यंत्रणांकडून वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या उंच टाकीवर चढून आंदोलन केलं. यावरुन आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली.
जरांगेंच्या डोळ्यांत अश्रू, SP काँवत यांची विनंती; अखेर २ तासांनी धनंजय देशमुख टाकीवरून खाली उतरले
आमदार क्षीरसागर यांनी खंडणीमुळे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाला आहे असा दावा केला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार संदीप श्रीरसागर यांनी केली.
'एबीपी माझा' या वृत्तावाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये आमदार क्षीरसागर यांनी ही मागणी केली. आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, पहिल्या दिवशी मी जेव्हा मस्साजोग गावात आलो होतो, तेव्हा मी हीच मागणी केली होती. लोकांच्या मनात रोष आहे. वाल्मीक कराड या गुन्ह्यातील मास्टरमाइंड आहे, या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी या प्रकरणाची मागणी सभागृहात केली आहे, असंही आमदार क्षीरसागर म्हणाले.
"वाल्मीक कराड याला ३०२ मध्ये घेतले नाहीतर लोक रस्स्यावर उतरतील. लोकांच्या रोष आहे. लोकांना कोणीही बोलावून घेतलेले नाही, त्यांचे ते येत आहेत. आज टाकीवर चढून त्यांनी आंदोलन केले. एखादा कोण टाकीवरुन पाय घसरुन पडला असता तर काय झाले असले. लोकांनी आधी टॉवरवर चढून आंदोलन करणार म्हणून सांगितलं पण ते पाण्याच्या टाकीतवर चढले. हे आंदोलन एका जातीचे नाही, सत्ताधारी पक्षातील नेतेही या प्रकरणावर बोलत आहेत, असंही आमदार क्षीरसागर म्हणाले.
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा: क्षीरसागर
"सगळी लोक त्यांच्याविरोधात बोलत आहेत. तरीही काहीही होत नाही. त्या सगळ्या प्रकरणाचे मास्टरमाइंड ते असूनही जर त्यांच नाव येत नसेल तर त्यांना कुठेतर संरक्षण त्या मंत्रिपदाच भेटत आहे. ते फिल्मी स्टाइलने येतात आणि सरेंडर होतात. याचा अर्थ कुठेतरी संरक्षण आहे, हा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन पदापासून दूर व्हावे,अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली.