घर बांधण्यासाठी 'आयुष्यभराची पुंजी' अडीज लाख बँकेतून काढले; चोरट्यांनी भरदिवसा पळवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 12:24 IST2025-11-12T12:20:05+5:302025-11-12T12:24:10+5:30
गेवराई शहरात मोठी खळबळ, नागरिकांमध्ये भीती

घर बांधण्यासाठी 'आयुष्यभराची पुंजी' अडीज लाख बँकेतून काढले; चोरट्यांनी भरदिवसा पळवले
बीड : गेवराई शहरात मंगळवारी भरदिवसा एका लाइनमनकडून बँकेतून काढलेली अडीच लाख रुपयांची रोख रक्कम हिसकावून दोन अज्ञात चोरट्यांनी पोबारा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर दुपारी १:५० वाजता घडलेल्या या घटनेमुळे गेवराई शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेवराई तालुक्यातील सेलू येथील रहिवासी दादासाहेब प्रभाकर यादव हे मंगळवारी दुपारी स्टेट बँक ऑफ इंडियामधून २ लाख ५० हजार रुपये काढून घराच्या बांधकामासाठी घेऊन जात होते. ते शहरातून जात असताना, त्यांच्या पाठीमागून एका स्पोर्ट्स बाइकवरून दोन व्यक्ती भरधाव वेगाने आले. या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने दादासाहेब यादव यांच्या हातातील पैसे असलेली बॅग अतिशय वेगाने हिसकावली आणि दोघांनी बीडच्या दिशेने पळ काढला. भरदिवसा आणि मुख्य रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे शहरात काही क्षणातच गोंधळ उडाला.
या घटनेनंतर दादासाहेब यादव यांनी तातडीने गेवराई पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ पोलिस ठाणे हद्दीत नाकाबंदी केली आहे. बीडकडे पळून गेलेल्या चोरट्यांचा आणि त्यांच्या स्पोर्ट्स बाइकचा शोध पोलिस घेत आहेत. यादव यांनी आयुष्यभराची पुंजी आणि घराच्या बांधकामासाठी हे पैसे काढले होते. भरदिवसा घडलेल्या या धाडसी चोरीमुळे गेवराई शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.