'हाच तो सरपंच, आपल्या पोरांना आडवा आला होता'; 'मोकारपंती' ग्रुपवर चार व्हिडीओ कॉल, काय झालं होतं बोलणं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 20:54 IST2025-03-07T20:53:53+5:302025-03-07T20:54:55+5:30
Santosh Deshmukh Videos And Photos: संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने जे आरोपपत्र दाखल केले आहे, त्यातून दररोज नवीन माहिती समोर येत आहे. देशमुखांना मारहाण करताना त्या ग्रुपवर चार वेळा कॉल करण्यात आला होता.

'हाच तो सरपंच, आपल्या पोरांना आडवा आला होता'; 'मोकारपंती' ग्रुपवर चार व्हिडीओ कॉल, काय झालं होतं बोलणं?
Santosh deshmukh Video: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे व्हायरल झालेले काही कथित फोटो पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाते. परंतु हा सर्व प्रकार फरार कृष्णा आंधळे याने 'मोकारपंती' व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हिडीओ कॉल करून दाखवत क्रूरतेचा कळस गाठला. सहा जणांनी तो कॉल उचलल्याने त्यांनी ही क्रूर घटना 'लाइव्ह' पाहिल्याचे गेल्याचे समोर येत आहे. सीआयडीच्या दोषारोपपत्रातून ही माहिती समोर आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केले. त्यानंतर आधी वाहनात आणि नंतर खाली उतरवून पाइप, वायर आणि इतर हत्यारांनी संतोष देशमुख यांना बेदम मारहाण केली. याचे फोटोही आरोपींनी काढले.
त्यानंतर सायंकाळी ५:४६ वाजता कृष्णा आंधळे याने 'मोकारपंती' या व्हॉट्सअॅपवर ग्रुपवर व्हिडीओ कॉल केला. कधी १७ सेकंद, तर कधी ३० मिनिटे देशमुख यांना मारहाण करताना दाखविल्याचे आरोपपत्रात उल्लेख केलेला आहे. या ग्रुपमधील सहा जणांनी हा कॉल उचलला होता, असे समजते. सीआयडीने त्यांचेही जबाब घेतले आहेत.
संतोष देशमुख हत्या: कधी कधी करण्यात आले कॉल?
दिवस - ९ डिसेंबर २०२४
पहिला व्हिडीओ कॉल - ५ वाजून १४ मिनिटांनी - ४४ सेकंद
दुसरा व्हिडीओ कॉल - ५ वाजून १६ मिनिटांनी - ४५ सेकंद
तिसरा व्हिडीओ कॉल - ५ वाजून १९ मिनिटांनी - २.०३ मिनिटं
चौथा व्हिडीओ कॉल - ५ वाजून २६ मिनिटांनी - २.४४ मिनिटं
'लई मारला, आता सरपंचाला मारायचं बास करा'
आरोपी कृष्णा आंधळे याने त्याच्या मोबाईलमधून या ग्रुपवर हे कॉल केले होते. त्यातील एका कॉलमध्ये कृष्णा आंधळे हा जखमांनी रक्तबंबाळ झालेल्या संतोष देशमुखांचा चेहरा व्हिडीओ कॉलवरून ग्रुपमधील इतरांना दाखवत आहे.
त्यानंतर कृष्णा आंधळे ग्रुपमधील इतरांना म्हणतो की, 'हाच तो मस्साजोगचा सरपंच आहे. त्या दिवशी सुदर्शन भय्याला आणि आपल्या पोरांना आडवा आला होता.' त्यानंतर कृष्णा आंधळे तीन वेळा मोबाईलचा कॅमेरा संतोष देशमुखांच्या चेहऱ्याजवळ नेतो. त्यात देशमुखांच्या चेहऱ्यावरील जखमांमधून रक्त येताना दिसत आहे.
त्यानंतर ग्रुपमधील एकजण कृष्णा आंधळेला म्हणतो, 'वाघ्या, लई मारला आहे. आता बास करा त्या सरपंचाला मारायचे.'
फरार कृष्णा आंधळेची वाहने होणार जप्त
सरपंच हत्येपासून आठवा आरोपी कृष्णा आंधळे हा मोकाटच आहे. त्याचा शोध पोलिसांकडून सुरूच आहे. परंतु त्याच्याकडे असलेली पिकअप, ट्रक, दोन दुचाकी आणि एक कार जप्त केली जाणार आहे. न्यायालयाने यासंदर्भात आदेश केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सरपंच हत्या, खंडणी आणि मारहाण व अॅट्रॉसिटी असे तिन्ही प्रकरणे आता बीडच्या विशेष मकोका न्यायालयातच चालणार आहेत.
कराडकडे दीड हजार कोटीची संपत्ती
मास्टरमाइंड वाल्मीक कराड याच्याकडील संपत्तीचा अहवालही सीआयडीने दोषारोपपत्रात दाखल केला आहे.
यात महागड्या वाहनांसह भूखंड आणि इतर मालमत्तांचा समावेश आहे. परंतु त्याचा एकत्रित आकडा समोर आला नाही. आ. रोहित पवार यांनी मात्र, कराडकडे दीड हजार कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचा दावा केला आहे.
घुले म्हणतो, 'अण्णांची मागणी पूर्ण कर'
वाल्मीक कराड याच्याकडील तीन आयफोन पोलिसांनी जप्त केले. त्यातील डाटाही रिकव्हर करण्यात आला आहे. यात सुदर्शन घुले हा आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना वाल्मीक अण्णांची मागणी पूर्ण कर.
त्यानंतर तुला कसलीच अडचण येणार नाही, असे चित्रीत झाल्याचेही सांगण्यात आले. हे सर्व पुरावे सीआयडीने आरोपपत्रात जोडले आहेत.