हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 00:23 IST2025-10-30T00:20:12+5:302025-10-30T00:23:02+5:30
माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथील एका व्यक्तीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सही-शिक्क्याचे बनावट पत्र तयार केले.

हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
बीड: उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र बीड जिल्हा नियोजन कार्यालयात सादर केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बीडच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथील अशोक वाघमारे याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सही-शिक्क्याचे बनावट पत्र तयार केले. हे पत्र त्यांनी जिल्हा नियोजन कार्यालय, बीड येथे सादर केले.
बनावट सहीचा प्रकार समोर आल्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यानी जिल्हाधिकारी यांना याबाबत तातडीने माहिती दिली. तसेच पोलिसांशी संपर्क साधला. या बनावटगिरी प्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशन येथे अशोक वाघमारे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बनावटगिरी आणि उच्चपदस्थ नेत्यांच्या नावाचा गैरवापर करण्याच्या या प्रकारामुळे प्रशासकीय कामकाजातील गोपनीयतेवर आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
यापूर्वी सुद्धा असाच घडला होता प्रकार
भाजप आमदार प्रसाद लाड यांचे बनावट लेटरहेड व सही वापरून ३ कोटी २० लाखांचा निधी बीड जिल्ह्यात वर्ग करण्यात आल्याचा प्रकार जुलै २०२५ मध्ये समोर आला होता.
बनावट लेटरहेड, बनावट सही आणि हुबेहूब आवाज काढून ३ कोटी २० लाखांचा निधी बीड जिल्ह्यात वर्ग करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी लाड यांच्या आवाजात एआयद्वारे कॉल करून निधी त्वरित वर्ग करा, असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते.