तुमच्यामुळेच जिल्ह्याची बदनामी, महिला जशी स्वतःचं घर आवरते, तसं मी माझा जिल्हा सावरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 01:47 PM2022-03-21T13:47:34+5:302022-03-21T13:56:21+5:30
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पंकजा मुंडे यांचा पलटवार
बीड : माझ्या कार्यकाळात जिल्ह्याला मान खाली घालावी लागेल, असं काम केलं नाही. चांगले अधिकारी आणले. माझ्यावर ऑपरेशन झालं, तेव्हा आरोप करण्यात आले. मी बीड जिल्ह्याची काळजी करते. तुमच्या निष्काळजीपणामुळे जिल्ह्याची बदनामी झाली, असा आरोपही पंकजा मुंडे ( Pankaja Munde)यांनी नाव न घेता धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांच्यावर केला. तसेच महिला जशी स्वतःचं घर आवरते, तसं मी माझा जिल्हा सावरला. गुंडागर्दीचे राजकारण केले असते, तर मुंडे साहेबांना शोभलं असतं का? असा भावनिक प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थितांना केला.
लिंबागणेश जिल्हा परिषद सर्कलमधील ३२ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन बेलेश्वर संस्थान बेलगाव येथे पंकजा मुंडे यांच्याहस्ते शनिवारी केले, यावेळी त्या बोलत होत्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, जयश्री मस्के, बेलेश्वर संस्थानचे महंत महादेव महाराज भारती, माजी आ. आर. टी. देशमुख, राम कुलकर्णी, सर्जेराव तांदळे, अक्षय मुंदडा, भगीरथ बियाणी, स्वप्नील गलधर, उषाताई मुंडे आदी उपस्थित होते.
कोनशिलेवर नसले तरी जनतेच्या हृदयात माझे नाव
माझ्या कारकीर्दीत जिल्ह्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. चांगले अधिकारी आणले, महिलांची सुरक्षा, सन्मान वाढवला. रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, विम्यासह कोटयवधी रुपयांचा निधी आणला. हे सर्व मी श्रेय घेण्यासाठी कधीच केलं नाही. माझं नाव कोनशिलेवर नाही आलं तरी चालेल, पण ते जनतेच्या हृदयात कायम कोरलं जावं. भविष्यातही जिल्ह्याचं नाव चांगल्या गोष्टींसाठी घेतलं जावं, त्यासाठीच मी सदैव काम करत आहे, असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले. थेट नाव घेतले नसले तरी, पालकमंत्री धनंजय मुंडे आणि राकाँचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनाचा हा टोला समजला जात आहे.
तरुण नेता निर्माण करणारी फॅक्टरी
शेकडो कोटींचा विकास केला. केलेल्या कामांचं क्रेडिट घेत नाही. बीडमध्ये उत्तम रोजगार निर्मिती व्हावी, अशी इच्छा होती. बीडमध्ये रेल्वे आणली. महिला जशी स्वतःचं घर आवरते, तसं मी माझा जिल्हा सावरला. मी तुमची कर्जदार आहे. गुंडागर्दीचे राजकारण केले असते, तर मुंडे साहेबांना शोभलं असतं का? एक तरुण नेता निर्माण करणारी फॅक्टरी मुंडेसाहेबांनी तयार केली. माझ्यासोबत काम करणारा कार्यकर्ता मंत्री, आमदार, खासदार बनला पाहिजे, असेही मुंडे म्हणाल्या.
त्यांच्या शुभेच्छांची गरज नाही - मस्के
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के म्हणाले, ज्यांना कधी साधा चिरा रोवता आला नाही, ते फुकटचे श्रेय घेतात. चार जि. प सदस्यांना सोडून राष्ट्रवादीला शुभेच्छा देणाऱ्यांच्या शुभेच्छांची आम्हाला गरज नाही, असे म्हणत शिवसंग्रामचे आ. विनायक मेटे यांना टोला लगावला. तसेच पंकजाताई आणि जनतेचे आशीर्वाद काफी आहेत, असे सांगत, बीडचे विद्यमान आमदार हे ताईंनी मंजूर केलेल्या कामांचे नारळ फोडण्याशिवाय काहीच करत नाहीत, असा आरोप आ. संदीप क्षीरसागरांवर केला.