वाहनांचे बोगस फिटनेस देणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; मध्य प्रदेशातील केंद्रासह ५ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 16:47 IST2026-01-10T16:47:27+5:302026-01-10T16:47:31+5:30
प्रत्यक्षात वाहन हजर नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे फिटनेस प्रमाणपत्र

वाहनांचे बोगस फिटनेस देणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; मध्य प्रदेशातील केंद्रासह ५ जणांवर गुन्हा दाखल
बीड : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने अत्यंत नियोजनबद्धरीतीने तपास करून परराज्यातील स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राद्वारे चालणाऱ्या बोगस फिटनेस प्रमाणपत्रांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. प्रत्यक्षात वाहन हजर नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे फिटनेस प्रमाणपत्र देणारे मध्य प्रदेशातील इंदूर येथील एटीएस (ॲटोमॅटिक टेस्ट सेंटर) केंद्र आणि तीन खाजगी मध्यस्थांसह एनआयसीमधील एका अज्ञात व्यक्तीवर बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकीब रजा (रायपूर, छत्तीसगड), हाजी फारूक अब्दुल सत्तार मन्सुरी (वडोदरा, गुजरात), कपिल मौर्या (ग्वाल्हेर, मध्य प्रदेश), मे. अप्पू नोव्हेल सर्व्हिस इंदूरचे संचालक व कर्मचारी व एनआयसीमधील एक अज्ञात व्यक्ती अशी आरोपींची नावे आहेत. बीड आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक गणेश जयराम विघ्ने यांना कामकाजादरम्यान माहिती मिळाली होती की, परराज्यातील एटीएस केंद्रांमधून मोठ्या प्रमाणात वाहनांची प्रत्यक्षात तपासणी न करताच बोगस फिटनेस प्रमाणपत्रे जारी केली जात आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी एक विशेष तपास पथक नियुक्त केले. या पथकाने या रॅकेटचा छडा लावण्यासाठी तीन ‘डमी’ वाहनांचा वापर केला.
तपास पथकाने डमी वाहनासाठी (क्रमांक एमएच-१२-व्हीटी-८२९९) रायपूर येथील साकीब रजा नावाच्या मध्यस्थाशी संपर्क साधला. त्याने कोणत्याही तपासणीशिवाय ११,००० रुपयांत फिटनेस करून देण्याचे आश्वासन दिले. धक्कादायक बाब म्हणजे, हे वाहन बीडमधील एका गॅरेजमध्ये आणि टोल नाक्यावर होते, त्याच वेळी मध्य प्रदेशातील ‘अप्पू नोव्हेल सर्व्हिस’ या केंद्राने हे वाहन त्यांच्या लेनमध्ये हजर असल्याचे भासवून फिटनेस प्रमाणपत्र जारी केले. आरटीओने पुराव्यासाठी या वाहनाचे टोल ट्रांझॅक्शन आयडी आणि व्हीएलटीडी लोकेशनचा डेटा गोळा केला, त्यामुळे हे प्रमाणपत्र बोगस असल्याचे सिद्ध झाले. तसेच एमएच-४७-वाय-६७२४ या डमी वाहनासाठी वडोदरा येथील हाजी फारूक मन्सुरी याने १३,००० रुपये घेऊन पुन्हा त्याच इंदूरच्या एटीएस केंद्राकडून बोगस प्रमाणपत्र मिळवून दिले. हे वाहन बीडमधील एका शोरूममध्ये दुरुस्तीसाठी उभे असताना कागदोपत्री मात्र ते इंदूरमध्ये तपासणीसाठी हजर दाखवण्यात आले होते.
एनआयसी डेटाशी छेडखानी
सर्वात गंभीर प्रकार डमी वाहन क्रमांक एमएच-०४-ईएल-५८२५ या तिसऱ्या वाहनाच्या बाबतीत समोर आला. ग्वाल्हेर येथील कपिल मौर्या या मध्यस्थाने ५५ हजार रुपये घेऊन, या वाहनाचा तब्बल ७५,५०० रुपयांचा सरकारी दंड बुडवला. विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगर आरटीओ कार्यालयातून बदली झालेल्या एका अधिकाऱ्याच्या नावाचा आणि जुन्या लॉगिन आयडीचा वापर करून हे प्रमाणपत्र पूर्वलक्षी प्रभावाने जारी करण्यात आले. यामध्ये एनआयसीच्या वाहन ४.० प्रणालीतील गोपनीय डेटाची चोरी किंवा छेडखानी झाल्याचे समोर आले आहे.