बीडमध्ये दहावीच्या परीक्षेत हॉलतिकीटवरचा फोटो बदलून 'तोतया' परीक्षार्थी आला, दोघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 19:37 IST2026-02-24T19:36:18+5:302026-02-24T19:37:51+5:30
पर्यवेक्षिकेच्या सतर्कतेने बिंग फुटले; दहावीच्या परीक्षेत 'मुन्नाभाई' स्टाईल तोतयेगिरी!

बीडमध्ये दहावीच्या परीक्षेत हॉलतिकीटवरचा फोटो बदलून 'तोतया' परीक्षार्थी आला, दोघांवर गुन्हा
बीड : सध्या सुरू असलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपी आणि इतर गैरप्रकार समोर आलेले असतानाच सोमवारी येथील यशवंत विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर एका पर्यवेक्षिकेच्या सजगतेमुळे तोतया परीक्षार्थी पकडला. या प्रकरणी केंद्र संचालकांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी (दि. २३) इयत्ता दहावीची द्वितीय भाषा विषयाची परीक्षा होती. दुपारी ११ ते २ वाजेदरम्यान उर्दू माध्यमाचा मराठी पेपर होता. शहरातील यशवंतनगर कॅनॉल रोडवरील यशवंत विद्यालयात पहिल्या मजल्यावरील हॉल क्रमांक १३ मध्ये शिक्षिका संध्या विश्वनाथआप्पा वाघमारे या पर्यवेक्षिका म्हणून नियुक्त होत्या. त्यामुळे हॉलमधील सर्व विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट त्या नियमाप्रमाणे तपासत होत्या. त्यांनी बैठक क्रमांक K073808 वर बसलेल्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट तपासले असता, त्याच्याकडे झेरॉक्स हॉल तिकीट मिळाले. त्यामुळे विचारपूस केली. नंतर त्याची माहिती परीक्षा लिपिक गोपीनाथ सोमनाथ गिते व केंद्र संचालक कृष्णचंद्र बाबूराव गाडेकर यांना दिली. त्यानंतर त्यांनी त्या विद्यार्थ्यांची अधिक विचारपूस करून बोर्डाकडून प्राप्त विद्यार्थी फोटो स्वाक्षरी कॉपीची खातरजमा केली.
केंद्र संचालकांनी केली चौकशी
केंद्र संचालकांनी चौकशी केली असता मंडळाकडून प्राप्त फोटो कॉपीमधील नाव व त्याचा फोटो वेगवेगळा असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे तोतया परीक्षार्थीची खात्री झाल्याने केंद्र संचालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोतयेगिरी
त्यामुळे परीक्षा बैठक क्रमांक K073808 वरील मूळ विद्यार्थी शेख शाहरूख व त्याच्या नावावर परीक्षा देण्यासाठी आलेला विद्यार्थी शोएब शेख (दोन्ही नावे बदलली आहेत) हे वेगवेगळे असून, दोघांनी संगनमत करून तोतयागिरी करून बनावट पद्धतीने परीक्षा देण्यासाठी आल्याचे स्पष्ट झाले.
झेरॉक्समध्ये बदलला फोटो, शाळेचा शिक्का नसल्याने तोतयेगिरी उघड
मिळालेल्या माहितीनुसार परीक्षा देण्यासाठी आलेल्या संबंधित तोतया विद्यार्थ्याकडे मूळ विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटची झेरॉक्स कॉपी होती. परंतु फोटो बदलला होता व त्यावर शाळेचा शिक्का नसल्याचे दिसून आल्याने पर्यवेक्षिकेला शंका आली. त्यानंतर केलेल्या विचारपूस व चौकशीनंतर तोतयेगिरी उघडी पडली. हॉलतिकीटच्या झेरॉक्सवर डमी होण्याचे धाडस केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.