परळीत अवैध राख वाहतूक सुरूच, एका पोलिसाकडे १५ जेसीबी अन् १०० टिप्पर: सुरेश धस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 18:44 IST2025-01-29T18:44:11+5:302025-01-29T18:44:49+5:30
सुरेश धस यांचे गंभीर आरोप : विष्णू चाटेच्या नावाने काढले ४६ कोटींचे बिल

परळीत अवैध राख वाहतूक सुरूच, एका पोलिसाकडे १५ जेसीबी अन् १०० टिप्पर: सुरेश धस
बीड : जिल्हा पोलिस दलातील भास्कर केंद्रे हा कर्मचारी १५ वर्षांपासून परळीतच आहे. त्याच्याकडे १५ जेसीबी आणि १०० टिप्पर आहेत. यातून तो राखेची अवैध वाळू वाहतूक करत आहे. तसेच मटकेवाल्याशीही त्याची भागीदारी आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्या नावाने परळीतून ४६ कोटी रुपयांचे बिले काढल्याचा गंभीर आरोप भाजपचे आ. सुरेश धस यांनी केला.
परळी ग्रामीण, परळी संभाजीनगर, सिरसाळा आणि बर्दापूर पोलिस ठाण्यात १० ते १७ वर्षांपासून पोलिस एकाच ठिकाणी आहेत. त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करावी. वाल्मीक कराड याला फरार होण्यासाठी कोणी कोणी मदत केली, त्यांची नावे पोलिसांना दिली आहेत. पोलिसांनी त्यांनाही सहआरोपी करावे. परळी नगरपालिकेचे स्पेशल ऑडिट करावे. कारण एका व्यक्तीच्या नावावर ४५ कोटी रुपयांची बिले काढली. यात विष्णू चाटेचाही समावेश आहे. एकाच रस्त्यावर पाच-पाच वेळा बिले काढल्याचेही आ. धस म्हणाले. तसेच करुणा शर्मा यांच्या वाहनात पिस्तूल ठेवणारे हे पोलिस होते. ते आजही बीड पोलिस दलात कार्यरत आहेत. त्यांचा शोध घेऊन निलंबन करावे. जर दोषी आढळले तर त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणीही आ. धस यांनी केली. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिल्याचेही ते म्हणाले. ५ फेब्रुवारीला मुख्यमंत्री आष्टी मतदारसंघात कार्यक्रमासाठी येणार असल्याचे धस यांनी सांगितले.
अवैध राख वाहतूक सुरूच
परळी थर्मलमध्ये २० वर्षांपासून अधिकारी, कर्मचारी हे एकाच पोस्टवर आहेत. या थर्मलमध्ये आजही अवैध साठे आहेत. ते कोणाचे आहेत, याची यादी मी पोलिस आणि थर्मल प्रशासनाला देणार आहे. हे सर्व साठे जप्त करावेत. सध्या परराज्यांत होणारी वाहतूक बंद असली तरी रात्रीच्या वेळी जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरूच आहे.
बियाणी आत्महत्या प्रकरणाची चौकशी करावी
भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी दोन वर्षांपूर्वी आपल्या परवानाधारक बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. यातही आ. धस यांनी संशय व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.