'चुकीच्या मार्गाने १०० रुपये कमवाल, तर जागा तुरुंगातच!" पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सज्जड दम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 14:27 IST2026-03-29T14:21:03+5:302026-03-29T14:27:11+5:30
अंबाजोगाई आणि परळी येथील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी हे कार्यालय सुरू करण्यात आल्याचे सांगताना पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना प्रामाणिकतेचा पाठ दिला.

'चुकीच्या मार्गाने १०० रुपये कमवाल, तर जागा तुरुंगातच!" पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सज्जड दम
"ज्याची ऐपत दहा पैशांची आहे, त्याने पंधरा पैसे कमवा... पण चुकीच्या मार्गाने शंभर रुपये कमवण्याचा प्रयत्न केला, तर त्याची जागा थेट तुरुंगातच असेल," अशा कडक शब्दांत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना सुनावले आहे. अंबाजोगाई येथे नवीन संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
अंबाजोगाई आणि परळी येथील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी हे कार्यालय सुरू करण्यात आल्याचे सांगताना पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना प्रामाणिकतेचा पाठ दिला. त्या म्हणाल्या, "मला कोणीही चुकीची कामं सांगायला येऊ नका. तुमच्या घरात पैसा कुठून येतोय, याचा हिशोब ठेवा. भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळवणाऱ्यांना कायदा सोडणार नाही."
माझ्याविरोधात कारस्थान करणाऱ्यांचं त्यांचं काय होतं...
राजकारणातील अंतर्गत संघर्षावर भाष्य करताना पंकजा मुंडे अधिक आक्रमक झाल्या. "जो माझ्यासोबत कारस्थान करतो, तो सध्या कुठे आहे हे तुम्हाला चांगलेच माहित आहे. माझ्या मनात पाप नाही, त्यामुळे देवाचा आशीर्वाद आणि जनतेचे प्रेम माझ्यासोबत आहे," असे म्हणत त्यांनी आपल्या विरोधकांना नाव न घेता टोला लगावला.
पराभवाने खचू नका, पण चुकीचे वागू नका
निवडणुकीतील पराभवाचा संदर्भ देत त्यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला. "राजकारणात जय-पराजय होत असतो, त्याने खचून जाण्याचे कारण नाही. मात्र, जे लोक चुकीच्या मार्गाने चालतात, ते राजकारणाच्या नकाशावरून कायमचे गायब होतात," असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.