पतीचे 'क्रूर' रूप! भांडणानंतर केलं दुसरे लग्न; जाब विचारताच पहिल्या पत्नीवर वस्तऱ्याने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 13:13 IST2025-11-11T13:12:53+5:302025-11-11T13:13:55+5:30
पत्नी माहेरी जाताच पतीने केले दुसरे लग्न; जाब विचारताच कपाळावर वस्तऱ्याने क्रूर वार

पतीचे 'क्रूर' रूप! भांडणानंतर केलं दुसरे लग्न; जाब विचारताच पहिल्या पत्नीवर वस्तऱ्याने वार
केज (जि. बीड) : येथील क्रांतीनगर भागात राहणाऱ्या पती-पत्नीमधील किरकोळ वाद विकोपाला गेल्याने धक्कादायक घटना घडली. पहिली पत्नी माहेरी राहत असताना भांडणानंतर पतीने अवघ्या चार महिन्यांत दुसरे लग्न केले. पहिल्या पत्नीने याचा जाब विचारताच, पतीने तिच्या कपाळावर धारदार वस्ताऱ्याने वार करून इतर तिघांच्या मदतीने तिला बेदम मारहाण केली. पहिल्या पत्नीच्या फिर्यादीवरून पतीसह चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
क्रांतीनगर येथील रहिवासी सतीश लांडगे आणि त्यांची पत्नी अंजना लांडगे यांच्यात चार महिन्यांपूर्वी किरकोळ भांडण झाले होते. त्यामुळे अंजना लांडगे या क्रांतीनगर येथील त्यांच्या मुलाच्या घरी राहत होत्या. याच काळात सतीश लांडगे यांनी दुसऱ्या महिलेशी लग्न करून तिच्यासोबत राजरोस राहण्यास सुरुवात केली. नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच अंजना लांडगे यांनी पतीकडे विचारणा केली. तसेच, सामान आणि घर बांधण्यासाठी दिलेले २ लाख रुपये परत मागितले असता, सतीश लांडगे यांनी त्यांना घराबाहेर हाकलून दिले. या घटनेनंतर अंजना लांडगे यांच्या फिर्यादीवरून पती सतीश लांडगे, अलका मुजमुले, किरण मुजमुले आणि कुणाल मुजमुले या चौघांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार त्रिंबक सोपने हे पुढील तपास करत आहेत.
वस्तऱ्याने वार करून जीवे मारण्याची धमकी
७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता अंजना लांडगे यांचा मुलगा आणि सून ऊस तोडणीसाठी साखर कारखान्यावर गेले होते. अंजना लांडगे घरी एकट्या असल्याची संधी साधून पती सतीश लांडगे याच्यासह अलका रोहिदास मुजमुले, किरण रोहिदास मुजमुले आणि कुणाल रोहिदास मुजमुले हे चौघेजण त्यांच्या घरात घुसले. या चौघांनी अंजना लांडगे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. क्रूरतेची परिसीमा गाठत पती सतीश लांडगे याने अंजना लांडगे यांच्या कपाळावर धारदार वस्तऱ्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.