बीड पालिकेत कहर, सफाई कामगाराचा अधिकाऱ्यासारखा रूबाब; लाच घेताना ACB कडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:26 IST2025-12-09T17:25:07+5:302025-12-09T17:26:45+5:30
सफाईचे काम सोडून अधिकाऱ्याच्या रूबाबात अभिलेखे विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला एसीबीकडून रंगेहाथ अटक

बीड पालिकेत कहर, सफाई कामगाराचा अधिकाऱ्यासारखा रूबाब; लाच घेताना ACB कडून अटक
बीड: नगर पालिका निवडणुकीच्या धामधुमीतच बीड नगर पालिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मागील महिन्यातच अविनाश धांडे नामक कर्मचाऱ्याने वरिष्ठ आणि सहकारी कर्मचाऱ्यांची नावे लिहून पालिकेच्या छतावर आत्महत्या केली होती. या घटनेची चौकशी सुरू असतानाच, आता मंगळवारी पालिकेतील एका सफाई कामगाराला एक हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
तक्रारदार यांनी एका महिन्यापूर्वी प्लॉट विक्रीसाठी अर्ज केला होता. त्यांना त्यांच्या प्लॉटची गुंठेवारीची प्रत खरी आहे की खोटी, हे पालिका अभिलेखे विभागाने ठरवून देणे आवश्यक होते. यासाठी तक्रारदारांनी रितसर शुल्क पालिकेत भरले होते. परंतु, अभिलेखे विभागात कार्यरत असलेल्या आशिष मस्के या सफाई कामगाराने हे काम करून देण्यासाठी तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची लाच मागितली. एवढेच नव्हे तर, त्याने तक्रारदारांशी उद्धट वर्तनही केले होते. या त्रासाला कंटाळून तक्रारदारांनी बीडच्या एसीबीकडे तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी बीड पालिकेच्या आवारातच सापळा लावला. आशिष मस्के याने पैसे स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला तातडीने ताब्यात घेतले. एका कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमुळे पालिका आधीच चौकशीच्या फेऱ्यात असताना, लगेच दुसऱ्या महिन्यात लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आल्याने पालिका प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एसीबीची ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.
आशिषचे पद कामगार, पण रूबाब अधिकाऱ्याचा
आशिष हा सफाई कामगार आहे. त्याने शहरात फिरून नियमित स्वच्छता करणे अपेक्षित आहे. परंतू त्याचा रूबाब अधिकाऱ्यांपेक्षा कमी नव्हता. त्याने स्वच्छता तर कधी केलीच नाही, परंतू अभिलेखे कक्षात राहून सामान्यांची कामे अडविणे, त्यांच्याकडून पैसे घेणे, असे प्रकार केल्याचे सांगण्यात आले. आता या विभागाचे प्रमुख आणि स्वाक्षरी करणारे अधिकारीही अडचणीत आले आहेत. आगोदरच या अधिकाऱ्यांची धांडे आत्महत्या प्रकरणात चौकशी सुरू आहे.