अल्पवयात मुलींचे हात पिवळे; मराठवाड्यातच लागले सर्वाधिक बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 06:10 PM2021-10-27T18:10:59+5:302021-10-27T18:14:11+5:30

केंद्र व राज्य शासनाकडून जनजागृती, उपाययोजना आदींच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात असली तरी हे बालविवाह रोखण्यात त्यांना अपयश आल्याचे दिसते.

The hands of young girls are yellow; Most child marriages started in Marathwada | अल्पवयात मुलींचे हात पिवळे; मराठवाड्यातच लागले सर्वाधिक बालविवाह

अल्पवयात मुलींचे हात पिवळे; मराठवाड्यातच लागले सर्वाधिक बालविवाह

googlenewsNext
ठळक मुद्देपरभणी अव्वल तर बीड दुसऱ्या स्थानीटॉप १० मध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा समावेश

- सोमनाथ खताळ
बीड : अल्पवयीन मुलींचे हात पिवळे करून त्यांना बोहल्यावर चढविण्यात राज्यात सर्वात आघाडीवर मराठवाडा आहे. यात परभणी जिल्हा अव्वल असून बीड दुसऱ्या स्थानी आहे. विशेष म्हणजे टॉप १० मध्ये मराठवाड्यातील सर्वच १० जिल्ह्यांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ (२०१९-२०) मधून युनिसेफ, एसबीसी ३ आणि महिला व बालविकास विभागाने ही माहिती दिली आहे. या आकडेवारीने चिंता व्यक्त केली जात आहे.

बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ४ मध्ये बीड जिल्हा बालविवाह लावण्यात राज्यात पहिल्या क्रमांकावर होता. जालना दुसऱ्या तर परभणी आणि औरंगाबाद तिसऱ्या क्रमांकावर होते. पाचव्या सर्वेक्षणात परभणीतील बालविवाहाचा आकडा वाढला असून, इतर जिल्ह्यांना कमी करण्यात यश आले आहे. असे असले तरी राज्यात बालविवाह थांबले नसल्याचे स्पष्ट होत आहे. केंद्र व राज्य शासनाकडून जनजागृती, उपाययोजना आदींच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात असली तरी हे बालविवाह रोखण्यात त्यांना अपयश आल्याचे दिसते. केवळ कागदी घाेडे नाचविण्यात प्रशासन धन्यता मानत असून आजही मराठवाड्यात अल्पवयीन मुलांना हात पिवळे करून बोहल्यावर चढविले जात आहे. हे रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आव्हान शासन आणि प्रशासनासमोर असणार आहे.

आजी मरायच्या आत नातीचे लग्न..
बालविवाहाचे मूळ कारण परिस्थिती आहे. ऊसतोडणीला जाताना जोडीला जास्त उचल (पैसे) मिळतात म्हणून लग्न लावून दिले जाते. तर आई-वडील कारखान्याला गेल्यावर मुलीची सुरक्षितता आणि संरक्षण हा महत्त्वाचा प्रश्न असतो. त्यामुळे विवाह लावून पालक जबाबदारी दूर करतात. तसेच आजी मरायच्या आत नातीचे लग्न व्हावे, कमविणारा अथवा नाेकरदार मुलगा भेटल्यास, कुटुंबातील सदस्याचे निधन झाल्यास एक वर्षाच्या आत लग्न लावणे, इतरांची मुलगी पळून गेली मग आपली पण जाईल का, या भीतीने मुलींचे हात पिवळे केले जात असल्याची उदाहरणे बीड जिल्ह्यात घडली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

२०० बालविवाह रोखण्यात यश 
बालविवाहांसदर्भात आम्हाला गोपनीय तक्रार प्राप्त होते. आम्ही लगेच प्रशासनाला मदतीला घेऊन संबंधित ठिकाणी जाऊन हा विवाह थांबवितो. वधू व वर यांच्या माता-पित्यांचे समुपदेशन करून त्यांना रीतसर नोटीस देतो. २०२१ या वर्षात बीड जिल्ह्यात जवळपास २०० बालविवाह रोखण्यात यश आले आहे. एकट्या मे महिन्यात ८३ विवाह रोखले.
- तत्त्वशील कांबळे, राज्य बालहक्क कार्यकर्ता

बालविवाह रोखण्याच्या अनुषंगाने प्रशिक्षण
बालविवाहच्या प्रमाणात परभणी अव्वल असून बीड दुसऱ्या स्थानी आहे. बीडचे प्रमाण सर्वेक्षण ४ पेक्षा आता कमी झाले आहे. बालविवाह रोखण्याच्या अनुषंगाने दोन दिवसांपूर्वीच बीडमध्ये सर्वांना कार्यशाळा घेऊन प्रशिक्षण देण्यात आले आहे.
- सोनिया हांगे, प्रकल्प समन्वयक, युनिसेफ, एसबीसी ३ व महिला व बालविकास विभाग, बीड

पहा आकडेवारी काय सांगतेय : 
जिल्हा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ४
परभणी ४८ ४५
बीड ४३ ५२
धुळे ४० ३५
सोलापूर ४० ३७
हिंगाेली ३८ ४१
उस्मानाबाद ३७ ३१
औरंगाबाद ३६ ४५
जालना ३५ ५०
नांदेड ३४ ४२
लातूर ३३ ३७
 

Web Title: The hands of young girls are yellow; Most child marriages started in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.