जीएसटी अधिकारी आत्महत्या प्रकरण: दिलीप फाटेंना पोलिसांचे ‘संरक्षण’?; चार दिवसांनंतरही गुन्हा दाखल नाहीच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 13:44 IST2026-01-21T13:44:25+5:302026-01-21T13:44:54+5:30
सुसाइड नोट असूनही पोलिसांची दिरंगाई; वर्षभराचे कॉल रेकॉर्ड तपासणार

जीएसटी अधिकारी आत्महत्या प्रकरण: दिलीप फाटेंना पोलिसांचे ‘संरक्षण’?; चार दिवसांनंतरही गुन्हा दाखल नाहीच!
बीड : येथील वस्तू व सेवा कर विभागाचे अधिकारी सचिन नारायण जाधवर (३५) यांनी सहायक आयुक्त दिलीप फाटे यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची ‘सुसाइड नोट’ जाधवर यांच्या खिशात सापडूनही अद्याप फाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना घडून चार दिवस उलटले आहेत. पोलिसांकडून आरोपीला वेळ देऊन एकप्रकारे ‘संरक्षण’ दिले जात असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.
सचिन जाधवर यांनी १७ जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार असल्याने ते गेल्या चार महिन्यांपासून तणावात होते. त्यातच सहायक आयुक्त दिलीप फाटे हे त्यांना सतत फोन करून आणि प्रत्यक्ष बोलावून मानसिक त्रास देत असल्याचा उल्लेख जाधवर यांनी सुसाइड नोटमध्ये केला आहे. तरीही बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात सध्या केवळ ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद असून गुन्हा दाखल झालेला नाही. याप्रकरणात सचिन जाधवर यांचे नातेवाईक मयुरी जाधवर यांनाही संपर्क केला परंतु कॉल न घेतल्याने बाजू समजली नाही.
नातेवाइकांकडे बोट दाखवून पोलिसांचे हात वर
‘नातेवाईकांनी अद्याप तक्रार दिली नाही,’ असे कारण पुढे करून पोलिस वेळ मारून नेत आहेत. मात्र, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, मृताजवळ सापडलेली चिठ्ठी हाच ‘मृत्यूपूर्व जबाब’ मानून पोलीस स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करू शकतात. असे असतानाही पोलिसांची टाळाटाळ संशयास्पद वाटत आहे. दरम्यान, पोलिस आता जाधवर आणि फाटे यांचे मागील एक वर्षाचे कॉल रेकॉर्ड तपासणार आहेत.
अविनाश धांडे आत्महत्या : नावे असूनही कारवाई शून्य!
बीड नगरपालिकेचे कर्मचारी अविनाश धांडे यांनी पालिकेच्या छतावरच गळफास घेतला होता. त्यांच्या मोबाइलमध्ये डीपीओ संभाजी वाघमारे, तत्कालीन मुख्याधिकारी नीता अंधारे, उपमुख्याधिकारी सम्राट कदम, विश्वंभर तिडके व चंदू काळे यांच्या त्रासाचा उल्लेख होता. मात्र, पोलिसांनी नातेवाइकांची तक्रार नसल्याचे कारण सांगत कोणावरही कारवाई न करता हे प्रकरण थंड बस्त्यात टाकले आहे. त्यामुळे येथेही पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली.
तपास सुरू आहे
नातेवाईक पोलिस अधीक्षक यांची भेट घेणार आहेत. ते तक्रार देण्यासाठी येणार आहेत, असे समजले. परंतु मी शासकीय कामानिमित्त अंबाजोगाईला आलो आहे. चौघांची चौकशी झाली असून आणखी काही लोकांची करत आहोत. पंचनामाही झाला आहे. सर्व तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
- बाळराजे दराडे, सहायक पोलिस निरीक्षक, बीड ग्रामीण