शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान, कर्जमाफी द्या! 'वंचित'चा आक्रोश मोर्चा धारूर तहसीलवर धडकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 19:02 IST2025-10-08T19:01:23+5:302025-10-08T19:02:13+5:30
हा आक्रोश मोर्चा शेतकरी, वंचितांच्या भावना शासनाकडे व्यक्त करण्यासाठी असून मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी केली मोर्चेकऱ्यांनी यावेळी केली.

शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान, कर्जमाफी द्या! 'वंचित'चा आक्रोश मोर्चा धारूर तहसीलवर धडकला
धारूर (बीड): अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, प्रलंबित सरकारी योजना आणि मूलभूत प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत धारूर तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य नागरिकांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज, बुधवारी दुपारी 'आक्रोश मोर्चा' काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या या मोर्चात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन तहसील कार्यालयासमोर शासनाविरोधात आवाज उठवत शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान, कर्जमाफी देण्याची मागणी केली.
धारूर तालुकाध्यक्ष प्रशांत उघडे यांच्या नेतृत्वाखाली हा विराट मोर्चा काढण्यात आला. विविध गावांमधून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून घोषणाबाजी करत तहसील कार्यालयाकडे कूच केले. मोर्चा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
हा आक्रोश मोर्चा शेतकरी, वंचितांच्या भावना शासनाकडे व्यक्त करण्यासाठी असून मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी केली मोर्चेकऱ्यांनी यावेळी केली. या मोर्चास वंचित बहुजन आघाडीचेबीड जिल्हाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे, महासचिव मिलिंद घाडगे, युवक जिल्हाध्यक्ष बाबुराव मस्के यांच्यासह धर्मानंद साळवे, अंकुश जाधव, कपिल उजगरे, रानबा उजगरे, शहराध्यक्ष आकाश गायसमुद्रे, अभिजीत वाव्हळ आदी प्रमुख नेते आणि धारूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी, कष्टकरी आणि शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या जनआक्रोश मोर्चात शेतकऱ्यांच्या आणि वंचित समाजाच्या हितासाठी आठ प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने खालील मागण्यांचा समावेश होता:
- राज्यात तात्काळ अतिवृष्टी जाहीर करावी.
- शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अतिवृष्टी अनुदान देण्यात यावे.
- सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी.
- कब्जा हक्कात असलेल्या गायरान धारकांना सातबारा देण्यात यावा.
- अनुसूचित जमातींची प्रलंबित जात प्रमाणपत्रे तात्काळ जारी करावीत.
- रमाई व पंतप्रधान योजनेतील लाभधारकांचे प्रलंबित हप्ते त्वरित देण्यात यावेत.
- संजय गांधी, श्रावणबाळ, निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे पगार वेळेवर द्यावेत.
- अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या गावांच्या पुलांची बांधणी तात्काळ करावी.