बांधावरील झाडे तोडण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 15:29 IST2019-05-17T15:25:39+5:302019-05-17T15:29:33+5:30
शेजारी शेजारी शेती असलेल्या शेतकऱ्यांमध्ये झाला वाद

बांधावरील झाडे तोडण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी
बीड : शेतातील बांधावर असणारे झाडे तोडण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटाचे लोक जखमी झाले. जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना १५ मे रोजी सकाळी ९ वाजता बीड तालुक्यातील वांगी येथे घडली होती. याप्रकरणी परस्पर आठ जणांविरोधात बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वांगी येथे पांडुरंग तुकाराम खडके व गजानन त्र्यंबक शेळके यांची शेजारीच शेती आहे. याच शेतीच्या बांधावर झाडे आहेत. हेच झाडे तोडण्याावरून दोन गट समोरासमोर भिडले. दोन्ही गटाच्या लोकांनी दगड, काठ्या, लोखंडी गज वापरून एकमेकांना मारहाण केली. त्यामुळे दोन्ही गटाचे लोक जखमी झाले. त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी पांडुरंग खडके याच्या फिर्यादीवरून गजानन शेळके, रघु उर्फ नवनाथ शेळके, शाम उर्फ पप्पू गोरख शेळके, चंद्रकला त्र्यंबक शेळके यांच्याविरोधात तर गजानन शेळके याच्या फिर्यादीवरून पांडुरंग खडके, अंजना खडके, नवनाथ खडके, पे्ररणा खडके यांच्याविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोउपनि बी.आर.कांबळे हे करीत आहेत.