माजलगावच्या माजी नगराध्यक्षांचा प्रताप; खोटी कागदपत्र तयार करून हडपला बहिणीचा प्लॉट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 15:32 IST2025-07-07T15:31:32+5:302025-07-07T15:32:42+5:30

अशोक होके, त्यांची पत्नी आणि नगरपालिकेच्या तत्कालीन तीन कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

Former Mayor of Majalgaon Ashok Hoke; Grabbed his sister's plot by preparing fake documents | माजलगावच्या माजी नगराध्यक्षांचा प्रताप; खोटी कागदपत्र तयार करून हडपला बहिणीचा प्लॉट

माजलगावच्या माजी नगराध्यक्षांचा प्रताप; खोटी कागदपत्र तयार करून हडपला बहिणीचा प्लॉट

माजलगाव (बीड) : येथील माजी नगराध्यक्ष अशोक होके यांना कुठलीही रजिस्ट्री व हक्क सोडत दिलेली नसताना बहिणीच्या नावे असलेला प्लॉट नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करून पत्नीच्या नावावर करून दिला होता. याप्रकरणी बहिणीच्या फिर्यादीवरून माजी नगराध्यक्ष अशोक होके, त्यांची पत्नी उज्वला होके व नगरपालिकेचे तत्कालीन तीन कर्मचाऱ्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

माजलगाव शहरातील सर्वे नंबर 374 मधील प्लॉट नंबर 27 हा शारदाबाई नारायणराव सोळंके यांनी 26 ऑगस्ट 1987 रोजी खरेदी केला होता. खरेदी नंतर नगरपालिकेत नियमानुसार नोंद घेतल्यानंतर त्याच्या अनेक वेळा पीटीआर देखील घेतली होती. 2011 साली शारदाबाई यांचे पती नारायणराव सोळंके हे सहसंचालक आरोग्य सेवा हिवताप या पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांचे पती नारायणराव सोळंके हे पीटीआर घेण्यासाठी गेले असता येथील 374 सर्वे नंबरमधील प्लॉट नंबर 27 हा उज्वला होके यांच्या नावे 2008 साली करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

हा प्लॉटवर कोणत्या आधारावर नाव लावण्यात आले याची माहिती मिळत नसल्यामुळे  माहितीच्या अधिकारात सोळंके दांपत्यांनी नगरपालिकेकडून माहिती घेतली. त्यातून कळाले की, 19 जानेवारी 2009 साली शंभर रुपयांच्या बॉंड पेपर वरती शारदाबाई सोळंके यांची खोटी स्वाक्षरी करून हक्क सोडपत्र तयार केले. तसेच सदर हक्क सोडपत्रात माजी नगराध्यक्ष अशोक होके यांच्या पत्नी उज्वला अशोक होके त्यांना दिला असे नमूद केल्याचे निदर्शनास आले.

फसवणुकीचा गुन्हा दाखल
माजी नगराध्यक्ष अशोक होके यांनी नगरपालिकेचे तत्कालीन कार्यालयीन अधीक्षक विलास बाबूदेव जोशी, तत्कालीन पीटीआर विभाग प्रमुख आयुब खान इस्माईल खान पठाण व तत्कालीन नामांतर विभाग प्रमुख अशोक भिमराव कुलकर्णी यांच्याशी संगनमत करून त्यांची पत्नी उज्वला अशोक होके यांचे नाव बनवत दस्तावेज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी वरील पाच जणांविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक केरबा माकणी हे करत आहेत.

Web Title: Former Mayor of Majalgaon Ashok Hoke; Grabbed his sister's plot by preparing fake documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.